साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर खुनाचा गुन्हा - Former NCP MLA from Satara charged with murder | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर खुनाचा गुन्हा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

नातेवाईकांनी केलेल्या आरोपानंतर त्याचे जबाब घेऊन कारखान्याचे चेअरमन राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, को चेअरमन मनोज घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे आणि त्याच्यासह अकरा सहकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा वडूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यातील मनोज घोरपडे आणि संग्राम घोरपडे यांना अटक करण्यात आली आहे. 

सातारा : पडळ (ता. खटाव) येथील खटाव-माण साखर कारखान्यातील जगदीप थोरात या अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. साखर कारखान्यातील साखरेची अफरातफर केल्याचा कारणातून कारखान्याचे चेअरमन, संचालक आणि इत्तर काही लोकांनी मारहाण केल्याची आणि त्यामध्ये थोरात यांचा मृत्यू झाल्याची नातेवाईकांची तक्रार कराड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या तक्रारीवरून कारखान्याचे चेअरमन राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, व्हाइस चेअरमन मनोज घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे आणि त्यांचे सहकारी असे अकरा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पडळ येथील खटाव-माण शुगर कारखान्यांत प्रोसेसिंग हेड म्हणून जगदीप थोरात कार्यरत होते.

१० मार्चला कारखान्यात साखरेची अफरातफर केल्याच्या कारणावरून जबाबदार म्हणून श्री. थोरात यांना मारहाण करण्यात आली होती. जगदीप थोरात यांना ११ मार्चला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, 

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी मारहाण करणार्‍या संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. परिणामी तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मृतदेह वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रात्री उशीरा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन गोवारे येथे अंत्यसंस्कार केले. प्रारंभी याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती.

मात्र नातेवाईकांनी केलेल्या आरोपानंतर त्याचे जबाब घेऊन कारखान्याचे चेअरमन राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, को चेअरमन मनोज घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे आणि त्याच्यासह अकरा सहकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा वडूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यातील मनोज घोरपडे आणि संग्राम घोरपडे यांना अटक करण्यात आली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख