साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनाचा `डोस` - Food and Drug Administration obstructs NCP's injection bank | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनाचा `डोस`

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात ना नफा ना तोटा तत्वावर रेमडिसिव्हर इंजेक्शनची बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे दोनशे इंजेक्शन्सची मागणी एका फार्मासिस्टच्या माध्यमातून केली पण त्याला अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांनी खो घातला आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून गंभीर रूग्णांना हे इंजेक्शन मिळविण्यासाठी काळ्याबाजारातून चढ्यादराने खरेदी करावी लागत आहे. अशा परिस्थितीत रूग्णांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात ना नफा ना तोटा तत्वावर रेमडिसिव्हर इंजेक्शनची बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे दोनशे इंजेक्शन्सची मागणी एका फार्मासिस्टच्या माध्यमातून केली पण त्याला अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांनी खो घातला आहे.

तुम्हाला इतक्या मोठ्याप्रमाणात इंजेक्शन्स कशाला हवी आहेत, असा दम भरून ही इंजेक्शन देण्यास कंपन्यांना मज्जाव केला आहे. त्यामुळे सत्तेत असूनही साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वेगळ्याच अडचणींचा सामाना करावा लागत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत जिल्ह्यात तुटवडा भासणारी रेमडिसिव्हरची इंजेक्शन गरजूंना उपलब्ध व्हावीत. यासाठी रेमडिसिव्हर इंजेक्शन बँक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुमारे पाच लाख रूपयांचा निधी जमा करून दोनशे इंजेक्शनची मागणी केली आहे. एका फार्मासिस्टच्या माध्यमातून ही इंजेक्शनची मागणी कंपनीकडे केली. पण या सर्व प्रक्रियेला अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अडकाठी घातली आहे.

इतकी इंजेक्शन कशाला हवीत, असे विचारत इंजेक्शन देण्यास कंपनीला रोखले आहे. त्यामुळे एका चांगल्या प्रक्रियेला खो घालण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पातळीवरील अधिकारी करत आहेत. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने मंत्री राजेंद्र शिंगणे यांना याबाबतची माहिती देऊनही याकडे अधिकारी दूर्लक्ष करून इंजेक्शन देणाऱ्या कंपन्यांवर दबाव आणत आहेत.

त्यामुळे खुद्द शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातारा जिल्ह्यात रेमडिसिव्हर इंजेक्शन ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करण्याचा निर्णय घेऊनही त्याला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी खो घालताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख