पेटत्या सिगरेटने पाच शिवशाही बस जळाल्या.... - Five Shivshahi buses burnt in Satara; A loss of one crore | Politics Marathi News - Sarkarnama

पेटत्या सिगरेटने पाच शिवशाही बस जळाल्या....

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात शिवशाही बसेस लावल्या जातात. या बसेस भाडेतत्वावरील असून मार्चपासून त्या जागेवरच उभ्या आहेत. याच ठिकाणी सायंकाळी शिवशाही बसमधून अचानक धूर येऊ लागल्याने परिसरात खळबळ उडाली.

सातारा : सातारा मुख्य बसस्थानकात आज सायंकाळी पाचच्या सुमारास लागलेल्या आगीत तब्बल पाच शिवशाही बस जळून खाक झाल्या. आग आटोक्‍यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे एक कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी एका 'विशेष मुलाला' पोलिसांनी ताब्यात घेतले असून या मुलाने पेटती सिगारेट बसमध्ये टाकल्याची चर्चा आहे. 

सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात शिवशाही बसेस लावल्या जातात. या बसेस भाडेतत्वावरील असून मार्चपासून त्या जागेवरच उभ्या आहेत. याच ठिकाणी सायंकाळी शिवशाही बसमधून अचानक धूर येऊ लागल्याने परिसरात खळबळ उडाली.

या घटनेची माहिती एसटी प्रशासनाने अग्निशमन दलाला दिली. पण, अग्निशामनच्या गाड्या येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. हवेत धुराचे लोट उसळले होते. हे धुराचे लोट पाहून अनेकांनी बसस्थानकाकडे धाव घेतली. बघता-बघता पाच बसेस आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या. दहा मिनिटानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत दोन बसेस जळून खाक झाल्या होत्या.

त्यांच्या शेजारीच असलेल्या इतर बसेसनाही आगीने घेरले होते. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने आग विझविण्यासाठी जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तब्बल तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. शिवशाही बस उभ्या असणाऱ्या मागील बाजूस मोठी इमारत असून तेथे अरूंद जागा आहे. त्यामुळे बसच्या मागील बाजूने आग विझविताना जवानांना अडथळा येत होता. अखेर अग्निशमन जवान, वाहतूक पोलिस, एसटी कर्मचाऱ्यांनी बसच्या काच्या फोडून आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला.  दरम्यान, या प्रकरणी एका 'विशेष मुलाला' पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलाने पेटती सिगारेट बसमध्ये टाकल्याची चर्चा आहे. 

शिवशाही बसच्या बॅटरी डिस्चार्च 
सातारा बसस्थानकाच्या आवारात दहा ते 12 शिवशाही बस लावण्यात आलेल्या आहेत. त्यामधील पाच ते सहा बस ह्या सुमारे सात महिन्यापासून बंद आहेत. सुरुवातीला एका बसला आग लागल्यानंतर शेजारीच लावलेल्या इतर बस काढण्याचा प्रयत्न काही चालकांनी केला. मात्र, या बसेसची बॅटरी डाऊन असल्याने बस सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे शेजारील इतर चार बस पेटत गेल्या. आग आटोक्‍यात आणल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने जळलेल्या बस बाहेर काढण्यात आल्या. तर, इतर बसेस दुसऱ्या बॅटऱ्या आणून इतरत्र हलविण्यात आल्या. या प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

आग लागलेल्या शिवशाही बसेस ह्या भाडेतत्वावरील होत्या. त्यामधील काही बस लॉकडाऊनपासून उभ्या होत्या. या बस तेथून हालविण्यासाठी संबंधित कंपनीला तीन वेळा नोटीस दिली होती. बसमधील सीट व अंतर्गत भाग जळून खाक झाला असून मात्र, त्यांचे इंजिन सुस्थितीत आहे. 

- रेश्‍मा गाडेकर : सातारा आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख