पुसेगांवचे पहिले आयपीएस अधिकारी ज्यांच्या कारकिर्दीचा राज्यात डंका वाजला....

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल येईपर्यंतच्या काळात पुण्यात फर्ग्युसन कॉलेजवरही धनंजयरावांनी दीड महिना लेक्‍चरर म्हणून काम केले होते. ट्रेनिंग संपताच धनंजयराव जाधवांची ठाणे येथे नियुक्ती झाली. त्या काळी ठाणे जिल्ह्याला आयुक्तालय नव्हते. सहायक पोलिस अधीक्षक म्हणून ते ठाण्याला गेले. पोलिस दलात काम करताना एक तरुण अधिकारी म्हणून डी. एन. जाधव स्वयंशिस्तीला महत्त्व देत होते.
The first IPS officer of Pusegaon whose career was celebrated in the state ....
The first IPS officer of Pusegaon whose career was celebrated in the state ....

विसापूर : उन्हाळा संपता संपता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मिळाला. धनंजयराव जाधव हे पहिल्या क्रमांकाने महाराष्ट्रात उत्तीर्ण झाले. शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक मिळाली. रायगड जिल्ह्यात ते रुजूही झाले. दरम्यानच्या काळात पूर्वीच्या तयारीच्या जोरावर ऑक्‍टोबरच्या दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाल्याचे त्यांना पत्र मिळाले. दोनच दिवसांची शिक्षणाधिकारीपदाची कारकिर्द सोडून ते मुंबईला गेले व तेथून डेहराडून एक्‍स्प्रेसने मसुरीला ट्रेनिंगला हजर झाले. त्यानंतर "डीएन' यांनी पोलिस दलात उच्च अधिकारी म्हणून केलेली कारकिर्द महाराष्ट्राचा लौकिक वाढवणारी ठरली.

धनंजयराव जाधव यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४७ मध्ये आजोळी माण तालुक्‍यातील बिदाल येथे झाला. धनंजयरावांचे वडील नामदेवराव जाधव हे स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच त्यांचे मामा शामराव बंडुजी जगदाळे हेसुध्दा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते. आई आणि वडील दोघांच्याही घराला स्वातंत्र्याच्या लढ्याचा अनुबंध होता. धनंजयराव पुसेगावच्या घरात लहानाचे मोठे होत गेले.

"कष्टानं मिळविलेलं जन्मभर सरत नाही आणि लोकांनी दिलेलं कधीच पुरत नाही,' असं साध सोपं तत्त्वज्ञान त्यांच्या आईचं होतं. तेच गुण व संस्कार धनंजयराव यांनी घेतले. त्याकाळी गावची प्राथमिक शाळा सातवीपर्यंत होती. महादेव मंदिराजवळील शाळेत ते सातवीपर्यंत शिकले. त्यानंतर त्यांनी वाई येथील द्रविड हायस्कूलला आठवीला प्रवेश घेतला. पण, आठ ते 15 दिवसांत धनंजयरावांनी तेथून काढता पाय घेतला व शेवटी साताऱ्याला जावून त्यांनी 1959 मध्ये आठवी इयत्तेसाठी पॉप्युलर इंग्लिश स्कूल आताचे "अनंत' या शाळेत प्रवेश घेतला.

नंतर त्यांनी पुणे येथील एम. ई. एस. कॉलेजमध्ये एफ. वाय. सायन्स केले आणि पुन्हा एस. वाय. व टी. वाय.साठी सातारा येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला. सातारा येथील कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत साताऱ्यात पहिला क्रमांक मिळवून सायन्समधील स्कॉलर म्हणून धनंजयराव जाधव साताऱ्यात चमकले. एम. एस्सी. झाल्यानंतर पुढे शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूरला 1970 मध्ये आय. एस. कोचिंग सेंटर काढले होते. तेथे फक्त नऊ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला होता.

त्यात धनंजयराव जाधवांना प्रवेश मिळाला व आय. एस. कोचिंग सेंटरमधून स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात झाली. 1971 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा मुंबईला जावून दिली. लेखी परीक्षा पास झाले. पण, शेवटी यशाने हुलकावणी दिली. त्याचवेळी दिवाळीच्या सुटीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होती. उन्हाळा संपता संपता महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल मिळाला व धनंजयराव जाधव पहिल्या क्रमांकाने महाराष्ट्रात उत्तीर्ण झाले.

महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग एक अंतर्गत शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक मिळाली व रायगड जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. दरम्यानच्या काळात पूर्वीच्या तयारीच्या जोरावर ऑक्‍टोबरच्या दरम्यान परत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसले होते व शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर लगेच त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगातून निवड झाल्याची तार पोस्टाने पुसेगावला घरी आली.

दोन दिवसांची शिक्षणाधिकारीपदाची कारकिर्द सोडून तातडीने आई- वडिलांचा आशीर्वाद, सेवागिरीचे दर्शन घेऊन सर्व साहित्य घेऊन धनंजयराव मुंबईला गेले व तेथून डेहराडून एक्‍स्प्रेसने मसुरीला ट्रेनिंगला हजर झाले. 
पुसेगावातून डी. एन. जाधवांनी 1972 च्या ऐतिहासिक दुष्काळात आय. पी. एस. होण्याचं मिळविलेलं यश हे केवळ पुसेगावलाच नव्हे तर सातारा जिल्ह्याला नवा मानदंड देणारं ठरणारं होतं.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल येईपर्यंतच्या काळात पुण्यात फर्ग्युसन कॉलेजवरही धनंजयरावांनी दीड महिना लेक्‍चरर म्हणून काम केले होते. ट्रेनिंग संपताच धनंजयराव जाधवांची ठाणे येथे नियुक्ती झाली. त्या काळी ठाणे जिल्ह्याला आयुक्तालय नव्हते. सहायक पोलिस अधीक्षक म्हणून ते ठाण्याला गेले. पोलिस दलात काम करताना एक तरुण अधिकारी म्हणून डी. एन. जाधव स्वयंशिस्तीला महत्त्व देत होते.

याचदरम्यान ठाण्यात वर्तकनगरमध्ये डी. एन. जाधव यांनी पत्नी शीलादेवींसह एका छोट्या सरकारी फ्लॅटमध्ये संसार सुरू केला. घरात फारशा सुविधा नव्हत्या. नवेपणाचं हळुवार नातं पारिजातकाच्या प्रसन्न फुलांसारखं टवटवीत होतं. पोलिस अधिकारी या क्रेझपेक्षा एक सालस, साधा, कुटुंबवत्सल, निर्मळ मनाचा पती म्हणून शीलादेवींच्या आयुष्याला डी. एन. जाधव संसारात लाभले होते. ठाण्याहून धुळ्याला असिस्टंट सुपरिटेन्डेंट ऑफ पोलिस म्हणून बदली झाली.

 पुढे पोलिस अधीक्षक म्हणून प्रमोशन मिळून वर्ध्याला बदली झाली. नंतर अहमदनगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले. काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजयराव जाधव यांनी 2004 ते 2007 या काळात पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून काम केले. तर 2007 मध्ये मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. 

जाधव यांना उत्कृष्ट सेवेबद्दल 1992 मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी स्वातंत्र्यदिनी पोलिसपदक प्रदान करून जाधवांचा गौरव केला होता. त्याच वर्षी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सन्मानचिन्ह देऊन धनंजयराव जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला होता. "दाऊ शाल्ट नॉट फेल' आणि "फॉर द व्हिलेज फ्रॉम द व्हिलेज टू द व्हिलेज' ही त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांनी पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलच्या माध्यमातून पुसेगाव येथे सलग 16 वर्षे आरोग्य शिबिर राबविले आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com