एसपी तेजस्वी सातपुतेंच्या शब्दांनी डोळे भरून आले; कोरोनाशी लढलेल्या अधिकाऱ्याची भावना

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी फक्त जिल्हा पोलिस प्रमुखच नव्हे तर एक कुंटुबप्रमुख या नात्याने प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोना आजाराची सुरवात झाल्यापासून आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या.
SP Tejaswi Satpute and API Hanumant Gaikawad
SP Tejaswi Satpute and API Hanumant Gaikawad

सातारा : तुम्ही टेन्शन घेवू नका, हे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे आधाराचे शब्द ऐकून डोळे पाण्यानं भरून आले. सकाळी अकरा वाजता इंजेक्शनचा मेसेज मी मॅडमना दिल्यानंतर रेमडीसेव्हरची सहा ही इंजेक्शन घेऊन पोलिस टिम दुपारी अडीच वाजता नोबेल हॉस्पिटल हडपसरला पोहोचली होती. इंजेक्शन आणलीत असे जेव्हा डॉक्टरांना सांगितले त्यावर त्यांचाही विश्वास बसेना. अवघ्या तीन तासाच्या आत साताऱ्यातून पुण्यात इंजेक्शन उपलब्ध करून दिली. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या केवळ जिल्हा पोलिस प्रमुखच नव्हे तर एक कुंटुबप्रमुख या नात्याने प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनात आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  

हे अनुभव आहेत खंडाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक हनुमंत गायकवाड यांचे. कोरोना संक्रमित कालावधीमध्ये उपचारादरम्यान आलेले अनुभव आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या प्रयत्नातून मिळालेले जीवदान, याविषयी त्यांनी आपल्या फेसबुकपेजच्या माध्यमातून मांडले आहेत. 

खंडाळा पोलिस ठाण्यात १६ जुलैला नेहमी प्रमाणे सकाळी नऊ वाजता हजर झालो. त्या अगोदर दोनच दिवस खंबाटकी घाटात प्रेमीयुगलांना लुटमार करणारी टोळी मी आणि माझ्या तपास पथकाने पकडली होती. त्याच तपासाचे काम चालू होते. आरोपी अटकेत
होते. आरोपीकडून एकुण नऊ वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांची उकल झाली होती. गुन्ह्यातील गेलेल्या मालाची रिकव्हरी करण्यात आमची टिम व्यस्त होती. रिकव्हरी करीता वाई, भुईंज, फलटण, ताथवडे, सांगवी असा दिवसभराचा प्रवास केला.

संध्याकाळी पुन्हा खंडाळा येथे आलो. तपासामध्ये प्रगती होवून आणखी गुन्हे उघड होत असल्याने एक वेगळेच समाधान आमच्या टिमला होते. कोरोनाचा आम्हांला पुर्ण विसर पडला होता..एवढे आम्ही तपासामध्ये व्यस्त होतो. शुक्रवारी १७ जुलै २०२० नेहमी प्रमाणे सकाळी माँर्निंग वाॅकला उठलो. प्रचंड अंगदुखी या व्यतिरिक्त दुसरा काहीच त्रास होत नव्हता. प्रवास झाल्यामुळें अंग दुखत असेल म्हणून दुर्लक्ष करून
नेहमी प्रमाणे नऊ कि.मी. हरळी गावापर्यंत मॉर्निंग वॉक करून आलो.

परंतु नेहमीप्रमाणे फ्रेश वाटायला पाहिजे तसे काहीच जाणवले नाही.  म्हणुन पोलिस ठाण्यात जाता जाता सहकारी डॉक्टर मित्रांला फोन करून हकीकत सांगितली. त्यांनी हॉस्पिटलला येऊन एक अंगदुखीचे इंजेक्शन घेऊन जा, असे सांगितले. त्याचवेळी थोडा ताप सुध्दा असल्याचे त्यांनी सांगितले. शंका नको म्हणून तात्काळ शिरवळला जाऊन स्वॅब देऊन टाकण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे सकाळी अकरा वाजता शिरवळला स्वॅब देऊन पुन्हा पोलिस ठाण्यात येऊन कामकाज करीत बसलो. 

संध्याकाळी नऊ वाजता हजेरी संपवून घरी गेलो. नुकतेच जेवण करून बसलो. त्याचवेळी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांचा फोन आला. त्यांनी फक्त स्वॅब दिला होता का? असे विचारले त्यावर मी काही बोलायचे आत रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे, असे सांगून फोन ठेऊन दिला. दोन मिनिटे काहीच सुचेना घरात पत्नी दोन मुले. मुलीने तर पॉझिटीव्ह एवढाच शब्द ऐकला तीने लगेच रडायला सुरवात केली.

जेमतेम दहा वर्षाच वय तिचं कशीबशी तिची पत्नीने समजूत काढली. मार्च
महिन्यापासून आजअखेर खांद्याला खांदा लावून कोरोना कालावधीत खंडाळा येथे ज्यांच्यासोबत काम केले. त्याच सहकारी अधिकारी यांनी केवळ रिपोर्ट पॉझिटीव्ह आला म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलून काही बोलायच्या आत फोन ठेऊन दिला. बाकी मदत करणे तर खुप लांबची गोष्ट. प्रंचड वाईट वाटले आणि खऱ्या अर्थाने तेथूनच हेळसांड होण्यास सुरवात झाल्याचा अनुभव सुरू झाला. 

परिस्थितीचे गांभीर्य ठेऊन खचून न जाता पत्नी व मुलांना धीर देऊन लागलीच आवश्यक ते साहित्य घेवून बॅग भरून पंधरा मिनिटाच्या आत रुमच्या बाहेर पडलो. पत्नी आणि मुले त्यांचे अश्रु लपवू शकत नव्हते. ती परिस्थिती खुप भयावह होती. 
रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याबाबतची माहिती मी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांना कळविली. त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन आधार देऊन विचारपूस केली. त्यानंतर
थोडी माझी मानसिकता बदलली.

मॅडम यांनी तात्काळ तयार रहा, मी तुमच्या करीता वाई येथील घोटावडेकर हॉस्पिटलला बेडची सोय केली आहे. तसेच वरिष्ठ पोलिस निरिक्षक आनंद खोबरे यांना देखील पूर्व कल्पना दिलेली आहे. तुम्ही वाईला रवाना व्हा असे सांगून  काही ही अडचण आली तरी थेट माझ्या मोबाईल फोनवर संपर्क करण्याच्या सुचना ही त्यांनी दिल्या. मी देखील ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता वरिष्ठांनी दिले आदेशानुसार माझ्या स्वतः चे कारने वाईला रवाना झालो.

घोटावडेकर हॉस्पिटल माहिती नव्हते. वरिष्ठ पोलिस निरिक्षक खोबरे साहेबांनी मला हॉस्पिटलला पोहचविण्यासाठी रस्त्यावर एक कर्मचारी उभा केला होता. तो माझी वाटच पाहत उभा होता. त्यांनी मला घोटावडेकर हॉस्पिटलला पोचविले. मी जाण्यापुर्वीच पोलिस अधीक्षक मॅडम यांनी डॉक्टरांना माझ्या बाबतची माहिती देऊन ठेवली होती. दरम्यानच्या कालावधीत अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उप विभागीय पोलिस अधिकारी फलटण विभाग तानाजी बरडे, वाई उप विभागीय अधिकारी अजित टिके तसेच जिल्ह्यातील इतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सहकारी अधिकारी यांनी देखील आस्थेने काळजी पोटी फोन करून विचारणा करून मानसिक धीर देऊन आधार दिला. 

दोन दिवसाचा कालावधी घोटावडेकर हॉस्पिटला गेला. तोपर्यंत तीव्र अशी कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. पंरतू तिस-या दिवशी अचानक भयंकर खोकला वाढू लागला एक दोनवेळा फणफणून थंडी ताप आला. डॉक्टरांना माहिती दिली. त्यांनी पॅरासिटामॉल व खोकल्यावर बेनेड्रिअल औषध या व्यतिरिक्त काही वेगळे उपचार केले नाही. मी डॉक्टरांना विनंती केली. मला खोकल्यामुळे धाम लागल्यासारखे होतेय ताप कमी जास्त होतोय. त्यावर डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या, होईल कमी अशी समजूत घातली. 

अगोदरच कोणी जवळ येत नाही त्यात लांबूनच बरे होण्याची दिलेली सहानुभूती व मानसिक आधार या व्यतिरिक्त इतर कोणतेही शारीरिक उपचार नाहीत... खोकला तर वाढत चाललेला औषधे घेवुन हि फरक नाही..घोटावडेकर हॉस्पिटला बाधित रुग्णांची लागलेली रिघ. अशातच नर्सेस नेहमी प्रमाणे ऑक्सिजन लेवल चेक केली आणि ती अचानक ८२ ते ८३ पर्यंत खाली आली. मग त्यानंतर डॉक्टरांनी माझा इसीजी काढला. परत एकदा तोच मानसिक आधार रिपोर्ट छान आहेत. काही घाबरायचे नाही ठिक होईल सगळं.

फक्त दिलेल्या गोळ्या खा वाढेल तुमची ऑक्सिजन लेवल काळजी करू नका असे म्हणून परत एकदा पुर्वीप्रमाणेच दूरवरूनच मानसिक आधार दिला. पण माझा ताप आणि खोकला काही केले कमी होईना नाईलाजास्तव मी पुन्हा पोलिस अधीक्षक सातपुते यांना फोन करून माझी वरील परिस्थिती सांगितली. मला म्हणावे असे उपचार येथे मिळेनात खुप त्रास होतोय मला उपचारासाठी पुण्यात जायचं आहे.  तेव्हा त्यांनी कोठे उपचार घेणार असे विचारल्यावर कोणत्याही नामांकित रुग्णालयात मला पाठवा तिथे उपचार घेतो असे सांगितले.

त्यानंतर मॅडमनी स्वतः रुग्णालयाची माहिती घेऊन त्यांच्या संपर्कातून मला हडपसर येथील नोबेल रुग्णालयात जागा नसताना व्यक्ती:श पाठपुरावा करून एक बेड उपलब्ध करून घेतला. तातडीने १०८ ॲम्ब्युलन्स मधून मला पुणे हडपसर येथे पाठवले.. तोपर्यंत प्रकृती गंभीर होत चालली होती श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता.नोबेल हॉस्पिटलला गेल्यावर मला तात्काळ ऑक्सिजन लावावा लागला. सर्व शारिरिक तपासण्या झाल्या. त्यामध्ये मला कोरोना सह निमोनिया या आजाराचा तिव्र जंतूसंसर्ग झाल्याचे निदान झाले. श्वसनयंत्रणा प्रतिसाद देईना रोग प्रतिकारशक्ती कमी होत चालली होती.

निमोनिया आणि कोरोना चा प्रादुर्भाव वाढत चालला असून आजार गंभीर स्वरूप धारण करीत असल्याची माहिती डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगून टाकली. आणि डॉक्टरांनी जवळ कोणी नातेवाईक आहेत का विचारले. त्यावेळी माझे सोबत कोणीच नव्हते. पत्नी आणि मुलांना खंडाळा येथे विलगीकरण करण्यात आले होते. नातेवाईक सोबत असते तरी देखील कोणाला जवळ येता आले नसते. पंरतू बाहेरून लागणारी औषधे उपलब्ध करण्यासाठी निश्चितच त्यांची मदत झाली असती.  २३ जुलैला सकाळी नऊ वाजता डॉक्टर द्रविड व पोतद्दार राऊंडला आले.

त्यांनी ऑक्सिजन लेवल ८० पेक्षा खाली गेलेली पाहून त्याचवेळी क्रूत्रिम श्वसनयंत्रणा लावावी लागणार असल्याचे सांगितले. तसेच मला अतिदक्षता विभागात हलविले.
परंतू यामधून बाहेर पडण्यासाठी रेमडेसिव्हीरची एकुण पाच इंजेक्शन आणि क्टेंमराचे एक अशी एकुण सहा इंजेक्शनची आवश्यकता लागेल. परंतू वरील इंजेक्शनस हे सध्या पुण्यात सहज उपलब्ध होत नाहीत. तुम्ही तुमच्या स्तरावर आजच उपलब्ध करून घ्या, असे सांगितले. त्यानंतर मात्र साक्षात मृत्यूच मला समोर दिसायला  लागला...क्षणभर चेहरा निस्तेज झाला... भुंगे मेंदू कुरतडायला लागल्या
सारखे वाटू लागले.

पुण्यासारख्या ठिकाणी औषधांची ही परिस्थिती म्हटल्यावर मला नक्कीच इंजेक्शन मिळणार नाही आणि आपण या गंभीर आजारातून वाचणार नाही याबद्दलचा आत्मविश्वास मावळू लागला. शेवटची संधी म्हणून लागलीच पोलिस अधीक्षक सातपुते मॅडमना फोन केला वरील हकीकत सांगितली. इंजेक्शनची तर खुप आवश्यकता आहे. पण ती पुण्यात उपलब्ध होतील असे वाटत नाही. इंजेक्शन शिवाय पर्याय नाही, असे मॅडमना सांगितले. त्यावर सातपुते मॅडम यांनी मला, तुम्ही निश्चितं रहा काळजी करू नका. मी ताबडतोब पोलिस वेल्फेअरचे अधिकारी श्री. वाघ यांना पुर्णपणे नियोजन करण्यासाठी सांगते.

प्रवासाचा कालावधी वगळता कोणतीही दिरंगाई होणार नाही. इंजेक्शने आजच पुण्यात नोबेल हॉस्पिटला पोलिस वाहनांतून तातडीने पोहोच केली जातील. तुम्ही टेन्शन घेवू नका हे मॅडमचे आधाराचे शब्द ऐकून डोळे पाण्यानं भरून आले.  सकाळी अकरा वाजता इंजेक्शनचा मेसेज मी मॅडम ना दिल्यानंतर वरील सहा ही इंजेक्शन घेवुन पोलिस टिम दुपारी अडीच वाजता नोबेल हॉस्पिटल हडपसरला पोहोचली. आणि पुढील उपचार तातडीने सुरू करणेस डॉक्टरांना मॅडमनी स्वतः फोनद्वारे सांगितले. इंजेक्शन आणली आहेत असे जेव्हा डॉक्टरांना सांगितले त्यावर त्यांचा विश्वास बसेना.

अवघ्या तीन तासाच्या आत सातारा येथून इंजेक्शन पुण्यात उपलब्ध करून दिली.
 पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी फक्त जिल्हा पोलिस प्रमुखच नव्हे तर एक कुंटुबप्रमुख या नात्याने प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोना आजाराची सुरवात झाल्यापासून आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या. पण पुण्यासारख्या मेट्रोपोलिटियन शहरात जी इंजेक्शन उपलब्ध होवू शकली नाहीत. ती भविष्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा पोलिस दलासाठी सातपुते मॅडम यांनी ती उपलब्ध करून तरतूद करून ठेवली होती.

 माझ्या सारख्या कोरोना बाधिताला कोणतेही आडेवेढे न घेता उपलब्ध करून देऊन ख-या अर्थाने माझे प्राण वाचवण्यासाठी जी मदत केली ती शब्दात व्यक्त न करण्यासारखी आहे. खरचं  पोलिस खात्याचा आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा मी सदैव ऋणी राहिन. तसेच या कठीण प्रसंगी मला व माझ्या कुटुंबियांना मानसिक आधार देणारा माझा मित्रपरिवार पोलिस स्टाफ यांचे देखील शत:श आभारी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com