पंचाऐंशी वर्षांच्या 'बुलेट राजा'ची 42 वर्षांपासून बुलेट सवारी... 

मारुती दादांनी 1978 साली पुण्याच्या शोरूम मधून बारा हजारात बुलेट खरेदी केली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी 42 वर्षात बुलेट व्यतिरिक्त दुसरी कोणतीही गाडी चालवली नाही.
Eighty-five-year-old 'Bullet King' has been riding only bullets for 42 years.
Eighty-five-year-old 'Bullet King' has been riding only bullets for 42 years.

कोपर्डे हवेली : बुलेटची धक धक आजही तरुणाईला भुरळ घालते. तरुणाईत बुलेटची मोठी क्रेझ असली तरी बुलेट चालवणे तितके सोपे नाही. याचे कारण म्हणजे बुलेटचे अतिरिक्त वजन आणि गाडीचा आकार. हौस म्हणून बुलेट घेणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी नंतर ती चालवणे झेपत नाही. या सगळ्याला छेद देत कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील शेतकरी मारुती चव्हाण हे 1978 पासून अविरत बुलेट चालवत आहेत. हे पंच्याऐंशी वर्षाचा 'बुलेट राजा' तब्बल 42 वर्षांपासून फक्त बुलेटची सवारीच करत आहे. 

विशेष म्हणजे या 42 वर्षात त्यांच्याकडून एकही अपघात झाला नाही की कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. आजही ते त्याच दिमाखात आणि रुबाबात बुलेट चालवतात. त्यांच्या या बुलेट प्रेमामुळे गावांसह परिसरातील लोक त्यांना बुलेटवाले दादा या नावाने ओळखतात. धोतर, तीन बटणी नेहरू आणि डोक्यावर पटका या पोषाखात असणाऱ्या दादांचा बुलेट चालवतानचा रुबाबदारपणा लोकं कुतुहलाने बघतात.

कॉलेज युवकांना लाजवेल असाच काहीसा त्यांचा बुलेट चालवण्याचा अंदाज आहे. अलीकडच्या काही वर्षांत तरुणांत बुलेटची मोठी क्रेझ पाहण्यास मिळत आहे. तसे पाहिले तर बुलेटचा इतिहास जुना आहे. मात्र, त्या काळात बुलेटला मागणी कमी होती. बडे बागायतदार, उद्योजक वा राजकीय नेते मंडळींकडेच बुलेट दिसायची. पूर्वी हलकी दुचाकी वाहने खरेदी करण्याकडे लोकांचा कल होता.

त्या काळात मारुती दादांनी 1978 साली पुण्याच्या शोरूम मधून बारा हजारात बुलेट खरेदी केली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी 42 वर्षात बुलेट व्यतिरिक्त दुसरी कोणतीही गाडी चालवली नाही. स्वकष्टाने व मेहनतीने कमावलेल्या पैशातून त्यांनी ही बुलेट घेतली होती. त्यांनी आपल्या बुलेटची चांगल्या पध्दतीने काळजी घेतली आहे. एक सुरात, शिस्तीत ते बुलेट चालवतात अगदी हत्तीची चाल बोलतात. त्या रुबाबात ते बुलेटही चालवतात. 

आजच्या बटनस्टार्ट च्या जमान्यातही ते एका किक मध्ये बुलेट सुरु करतात. छोट्या दुचाकीला किक मारताना आजचे तरुण कंटाळा करताना दिसतात तीथे आजही हा पंच्याऐंशी वर्षाचा तरुण किक मारुनच बुलेट सुरू करतात. डोंगराळ भागात शेतातील खडतर रस्त्याने बुलेटवरुनचा प्रवास ते सहजरित्या करतात. आजही ते न चुकता बुलेटवरुन दररोज शेतामध्ये जाऊन छोटी मोठी कामे करतात. यापूर्वी त्यांनी कोल्हापूर, पुसेसावळी, जामखेड, पंढरपूर आदी ठिकाणी बुलेटवरुन प्रवास केला आहे. या वयातही ते ऊन, वारा, पाऊस या तीनही रुतुमध्ये बुलेटचाच प्रवास करतात. अपवाद वगळता 42 वर्षात बस अथवा चारकीचा प्रवास देखील केलेला नाही. 

बुलेट हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. बाहेरगावी गेल्यानंतर खुप ठिकाणी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह तरुणांना होतो. शहरात, महाविद्यालय परिसरात तरुण तरुणी त्यांना बुलेट चालवताना कुतुहलाने बघतात. महाविद्यालय परिसरात खुप वेळा त्यांना थांबवून त्याच्या सोबत फोटोसेशनही केले जाते. या वयातही त्यांचा बुलेट चालवण्याचा अंदाज थक्क करणारा आहे. बुलेट चालवताना हिरोगिरी करणारे अनेक तरुण आपण पाहिले असतील पण 42 वर्षात सेफ ड्रायव्हिंग करुन एकही अपघात होऊ न दिलेले मारुती दादा हे रिअल हिरो बनले आहेत. 

बुलेट चालवण्याचा अनुभव सुखद असून रुबाबदार वाटते. अजूनही मी तरुणच आहे असं वाटतं. मी माझ्या कष्टाने मेहनतीने कमावलेल्या पैशातून बुलेट घेतली. बेचाळीस वर्षाच्या बुलेट प्रवासात मला कधीच कोणती अडचण आलेली नाही. युवा वर्गाने बुलेट जरुर चालवावी, परंतु कोणत्याही प्रकारची हिरोगिरी अथवा निष्काळजीपणा न करता योग्य ती काळजी घेऊनच चालवावी.

- मारुती चव्हाण, कोपर्डे हवेली 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com