मुख्यमंत्र्यांच्या अहंकारामुळे मुंबईकर मेट्रोपासून पाच वर्षे दूर गेले - Due to the ego of the Chief Minister, Mumbaikar went away from Metro for five years | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या अहंकारामुळे मुंबईकर मेट्रोपासून पाच वर्षे दूर गेले

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 डिसेंबर 2020

 सरकारच्या अहंकारामुळे आणि कायद्याला धरून न वागण्याच्या वृत्तीमुळे आज मुंबईकर मेट्रोपासून किमान पाच वर्षे दूर गेले आहेत. फक्त राज्य सरकार आणि शिवसेनाच याला जबाबदार आहेत, अशीही तोफ भातखळकर यांनी डागली आहे.

मुंबई : मेट्रोबाबतचा आजचा उच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहंकार, कार्यपद्धती यांच्यामुळे मुंबईकर मेट्रोपासून किमान पाच वर्षे दूर गेले आहेत, अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आज केली आहे. 

उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर त्यांनी एक व्हिडियो समाजमाध्यमांवर प्रसारित करून वरील प्रतिक्रिया दिली आहे. आजचा हा निर्णय दुर्दैवी असला तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहंकार व त्यांची कार्यपद्धती यास जबाबदार आहे, असेही भातखळकर यांनी सुनावले आहे. 

हाच घटनाक्रम सन 2015 मध्येही उच्च न्यायालयात झाला होता. तेव्हाच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच मेट्रोची कारशेड आरे मध्ये उभारण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यांनी तसेच सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने यासंदर्भात नेमलेल्या तज्ञ समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करून आरेमधील कारशेडचे काम थांबवून ते कांजूरमार्ग ला नेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला.

त्यामुळेच राज्यावर आणि मुंबईकरांवर ही पाळी आली, असे कोरडेही भातखळकर यांनी ओढले आहेत. सरकारच्या अहंकारामुळे आणि कायद्याला धरून न वागण्याच्या वृत्तीमुळे आज मुंबईकर मेट्रोपासून किमान पाच वर्षे दूर गेले आहेत. फक्त राज्य सरकार आणि शिवसेनाच याला जबाबदार आहेत, अशीही तोफ भातखळकर यांनी डागली आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख