कोरोना आकड्यांची बनवाबनवी : पीआर यंत्रणांमार्फत जनतेची दिशाभूल नको; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

संसर्ग कमी होतोय हे दाखविण्यासाठी चाचण्या सुद्धा नियंत्रित केल्या जात आहेत. कमी चाचण्यांमुळे संसर्गाचे प्रमाण तर वाढतेच, शिवाय मृत्यूदरही वाढतो. परंतू अशापद्धतीने बनवाबनवी केली जात असल्याने कोरोनाचे वास्तविक चित्र जनतेपुढे येत नाही.
 Don't mislead the public through PR systems; Fadnavis Letter to the Chief Minister
Don't mislead the public through PR systems; Fadnavis Letter to the Chief Minister

मुंबई : मुंबईतील कोविड मृत्यूंची (Corona Death) नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना पाठविले आहे. (Don't mislead the public through PR systems; Fadnavis Letter to the Chief Minister)

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कोविडसंदर्भातील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीप्रमाणे कोविडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा आहे. फक्त त्याला अपवाद अपघात, आत्महत्या, खून या कारणामुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रूग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचा रूग्ण यांचा आहे. 

केवळ असेच मृत्यू हे 'अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू' या रकान्यात नोंदवायचे आहेत. मुंबईतील मृत्यूदर अथवा सीएफआर कमी  दाखविण्यासाठी नेमका किती भयंकर प्रकार होतो आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. उर्वरित महाराष्ट्रात एकिकडे अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू नोंदण्याचे प्रमाण 0.7 टक्के असताना, मुंबईत मात्र कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेदरम्यान हे प्रमाण 39.4 टक्के इतके आहे. पहिल्या लाटेत सुद्धा हे प्रमाण उर्वरित महाराष्ट्रात 0.8 टक्के तर मुंबईत 12 टक्के इतके होते. 

मार्च 2020 ते 30 एप्रिल 2021 या काळात मुंबईत 1593 इतके मृत्यू हे अन्य कारणांमुळे असे नोंदले आहेत, जे प्रमाण एकूण मृत्यूच्या 12 टक्के आहे. दुसर्‍या लाटेत तर 1 फेब्रुवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 या काळात 1773 पैकी 683 मृत्यू हे अन्य कारणांमुळे नोंदले आहेत. हे प्रमाण 39.4 टक्के इतके आहे. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने होतो आहे.

मुंबईसारख्या शहरात जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता किमान एक लाख इतकी आहे, तेथे केवळ सरासरी 34,191 इतक्याच चाचण्या प्रतिदिन केल्या जात आहेत. गेल्या 10 दिवसांतील सरासरी आणि त्यातही 30 टक्के या रॅपीड अँटीजेन प्रकारातील आहेत. आयसीएमआरने 30 टक्के रॅपीड अँटीजेन चाचण्या मान्य केल्या असल्या तरी त्या केवळ जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची पूर्ण क्षमता नाही अशा ठिकाणासाठी आहे. जेथे आरटीपीसीआरची पूर्ण क्षमता आहे, तेथे हे प्रमाण 10 टक्क्यांच्या वर असता कामा नये.

रॅपीड अँटीजेन चाचण्यांची कार्यक्षमता ही 50 टक्क्यांहून कमी असल्याने त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत तर भर पडते व संसर्ग दर हा कृत्रिमपणे कमी होत जातो. सात मे 2021 रोजी एकूण 45,726 इतक्या चाचण्या झाल्या, यातील रॅपीड अँटीजेन चाचण्या 14,480 इतक्या होत्या. हे प्रमाण 31.67 टक्के इतके असताना मुंबईचा संसर्ग दर 7.6 टक्क्यांवर आला. आठ मे 2021 रोजी एकूण चाचण्या 43,918 इतक्या झाल्या. यातील 13,827 रॅपीड अँटीजेन चाचण्या होत्या. हे प्रमाण 31.48 टक्के इतके असताना संसर्ग दर हा 6.9 टक्क्यांवर आला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 

रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण एकूण चाचण्यांमध्ये कमी असल्यास काय परिणाम होतो, हे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी काही उदाहरणे दिली आहेत. तीन मे 2021 रोजी एकूण चाचण्या 26,586 झाल्या, त्यात रॅपिड अँटीजेन चाचण्या 4453 होत्या. म्हणजे एकूण चाचण्यात रॅपीड अँटीजेनचे प्रमाण 17 टक्के. त्यादिवशी संसर्ग दर 11.3 टक्के होता. 4 मे 2021 रोजी एकूण चाचण्या 31,125 इतक्या झाल्या. 

त्यात रॅपीड अँटीजेन 7073. म्हणजे 22 टक्के. यादिवशी संसर्ग दर हा 9.1 टक्के इतका आला. म्हणजेच रॅपीड अँटीजेन कमी केल्या तर संसर्ग दर वाढतो आणि त्या वाढविल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होते. यातून हे अतिशय स्पष्ट होते की, संसर्ग कमी होतोय हे दाखविण्यासाठी चाचण्या सुद्धा नियंत्रित केल्या जात आहेत. कमी चाचण्यांमुळे संसर्गाचे प्रमाण तर वाढतेच, शिवाय मृत्यूदरही वाढतो. परंतू अशापद्धतीने बनवाबनवी केली जात असल्याने कोरोनाचे वास्तविक चित्र जनतेपुढे येत नाही. याशिवाय, अन्य कारणामुळे होणारे मृत्यू असे दाखवून त्यांचे कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार न केल्यास त्यातून अकल्पित अशा असंख्य संकटांना वेगळेच तोंड द्यावे लागेल, ही बाब वेगळी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com