शशीकांत शिंदें संघटनेचे होऊ शकले नाहीत ते जिल्ह्याचे काय होणार; शिवेंद्रबाबा जिल्हा बँकेत 'शटलमेंट' करू नका - Don't do 'shuttlement' in Shivendrababa District Central Bank | Politics Marathi News - Sarkarnama

शशीकांत शिंदें संघटनेचे होऊ शकले नाहीत ते जिल्ह्याचे काय होणार; शिवेंद्रबाबा जिल्हा बँकेत 'शटलमेंट' करू नका

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

शिवेंद्रसिंहराजे तुम्ही बेरजेचे राजकारण करू नका, कोणी तुमच्या अंगावर आले तर तुम्ही सुध्दा त्यांच्या अंगावर जायला पाहिजे. तरच समाज तुमच्या मागे उभा राहिल. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत शिवेंद्रसिंहराजेंनी बाहेर भांडणे दाखवून आतून शटलमेंट करू नये, असा सल्लाही त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिला.  

सातारा : खासदारकीच्या निवडणूकीत माझ्या विरोधात शशीकांत शिंदे यांनी काय काय केले, हे त्यांच्या जीवालाच माहिती आहे. त्याचा परिणाम कोरेगाव मतदारसंघातील लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. जो माणूस संघटनेचा होऊ शकला नाही, तो जिल्ह्याचा आणि कोरेगाव तालुक्याचा काय होईल, असा टोला माजी आमदार व माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे तुम्ही बेरजेचे राजकारण करू नका, कोणी तुमच्या अंगावर आले तर तुम्ही सुध्दा त्यांच्या अंगावर जायला पाहिजे. तरच समाज तुमच्या मागे उभा राहिल. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत शिवेंद्रसिंहराजेंनी बाहेर भांडणे दाखवून आतून शटलमेंट करू नये, असा सल्लाही त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिला. साताऱ्याचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात सध्या जावळी तालुक्यावरून वादंग रंगले आहे. या वादात आज माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी उडी घेतली आहे. त्यांनी शशिकांत शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.
 
नरेंद्र पाटील म्हणाले, माथाडी संघटनेत शशीकांत शिंदे आमच्यासोबत एकत्र होते. पण खासदारकीच्या निवडणूकीच्यावेळी शिवसेना- भाजपचे उमेदवार म्हणून माझ्या विरोधात शशीकांत शिंदे यांनी काय काय केले, हे त्यांच्या जीवालाच माहित आहे. त्याचा परिणाम कोरेगाव मतदारसंघातील लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. जो माणूस संघटनेचा होऊ शकत नाही. तो जिल्ह्याचा आणि तालुक्याचा काय होईल, असा टोला श्री. पाटील यांनी लगावला. 

ते म्हणाले, शशीकांत शिंदेंनी स्वतःची जबाबदारी संभाळून इतर ठिकाणी ढवळाढवळ करण्याची गरज नाही. शिवेंद्रसिंहराजे हे आमदार असून मागीलवेळी राष्ट्रवादीचे होते, आता ते भाजपचे आमदार आहेत. कोणाच्या मतदारसंघात कोणी ढवळढवळ करणे, हे मला ही पटत नाही. पण ते स्वतः ला पक्षाचे मावळे समजतात, ते पक्षाचे काम करणार जसे त्यांनी माझ्याविरोधात काम केले.

एका ताटात आम्ही खाल्ले, सुखदुखात सोबत राहिलो, पक्ष म्हणून त्यांनी माझ्या विरोधात काम केले. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंनी ही आपली ताकद दाखवली पाहिजे. शिवेंद्रसिंहराजे फार शांत पध्दतीने काम करतात. कोणी जर तुमच्या घरात घुसत असेल तर तुम्ही त्याला अडविले पाहिजे. त्याला जागा दाखविली पाहिजे. तुम्ही मवाळ स्वभावाचे आहात. तुमच्या वाटेला कोणीतरी आले तरी तुम्ही त्यांच्या वाटेला गेले पाहिजे.

बाबा बेरजेचे राजकारण करू नका, कोणी तुमच्या अंगावर आले तर तुम्ही सुध्दा अंगावर जायला पाहिजे. तरच समाज तुमच्या मागे उभा राहिल. अन्यथा समाज म्हणेल हे दोन नेते दाखवायला भांडत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत शिवेंद्रसिंहराजेंनी बाहेर भांडणे दाखवून आतून शटलमेंट करू नये. त्यांच्यामागे जावली व सातारा जिल्हा पाठीशी आहेत. शिवेंद्रसिंहराजे कधीही कुणाच्या नादाला लागत नाहीत आणि जर कोणी त्यांच्या नादाला लागलं तर त्याचा नाद संपवल्या शिवाय ते गप्प बसत नाहीत, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. 
       

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख