काका-बाबा गटाची दिवाळी गोड; पहिल्यांदाच एकत्रित मेळावा - Diwali sweet of Kaka-Baba group; Let's meet together in Karad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

काका-बाबा गटाची दिवाळी गोड; पहिल्यांदाच एकत्रित मेळावा

हेमंत पवार
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

मलकापूरचा पॅटर्न काँग्रेसच्या उभारणीसाठी कऱ्हाड दक्षिणमध्ये राबवण्याची कार्यवाही तेव्हापासून सुरू झाली. त्याची जाहीर घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात, आमदार चव्हाण, मंत्री बंटी पाटील व उंडाळकर यांच्या उपस्थितीत कऱ्हाडला पुढील आठवड्यात होणाऱ्या मेळाव्यात होईल. दोन्ही गट एकत्र आल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचा पहिलाच एकत्रित मेळावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात होणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच होणारा हा मेळावा चव्हाण-उंडाळकर गटासाठी येणाऱ्या निवडणुकांसाठी नव्या समीकरणांची नांदी ठरणार आहे. 

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ आत्तापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघाने ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते व त्यांच्यानंतर सलग तब्बल 35 वर्षे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिनिधीत्व केले. राजकीय संघर्षातून श्री. चव्हाण आणि श्री. उंडाळकर गटात नेहमीच मोठी चुरस होती.

माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांचे आई-वडील खासदार होते. त्यानंतर ते खासदार झाले. त्या काळातील राजकीय संघर्षातुन उंडाळकर हे बाजुला होऊन त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्या माध्यमातून त्यांनी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करत असतानाच त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबीनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री म्हणून काम पहात होते.

त्यामुळे ते दिल्लीत आणि उंडाळकर राज्यात आपला बकुब राखुन होते. त्यामुळे दोन्ही गटातील संघर्ष कमी करण्यासाठी कोणीच प्रयत्न केला नाही. मध्यंतरी अॅड. उदयसिंह पाटील यांच्यावर आलेल्या एका संकटावेळीही दोन्ही गटातील संबंध बरेच ताणले. त्यानंतर काही कालावधीनंतर दोन्ही गटातील वैरत्व कमी होऊ लागले. उंडाळकर-चव्हाण गटाच्या मनोमिलनाची सुरुवात उंडाळकरांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि मनोहर शिंदे यांनी एकत्रित येऊन लढवलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीपासून झाली. तेथे पहिल्यादांच त्या निवडणुकीत ते दोन गट एकत्र आले.

चव्हाण गटाचे शिंदे यांना उदयसिंह- उंडाळकर यांनी साथ दिली. मलकापूरचा पॅटर्न काँग्रेसच्या उभारणीसाठी कऱ्हाड दक्षिणमध्ये राबवण्याची कार्यवाही तेव्हापासून सुरू झाली. त्याची जाहीर घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात, आमदार चव्हाण, मंत्री बंटी पाटील व उंडाळकर यांच्या उपस्थितीत कऱ्हाडला पुढील आठवड्यात होणाऱ्या मेळाव्यात होईल. दोन्ही गट एकत्र आल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.

थोरातांची कसरत झाली....

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कऱ्हाडला माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम ठेवले होते. त्यावेळी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या. त्यामुळे दोन्ही परस्पर विरोधी गटांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत कार्यक्रम केले होते. त्यावेळी दोन्ही गटाचे कार्यक्रम अटेंड करताना श्री. थोरात यांची मोठी कसरतच झाली होती.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख