गणपतराव आबांच्या जाण्याने मोहिते-पाटील परिवाराला मोठा धक्का...

मंत्री असतानासुद्धा ते अत्यंत साधेपणानेच रहात असत. पद आज आहे उद्या नाही, राज्यकर्त्यांनी आपली सगळी शक्ती समाजाच्या विकासासाठी राबविली पाहिजे हा त्यांचा ध्यास असायचा.
The departure of Ganapatrao Abba is a big shock to the Mohite-Patil family ...ub73
The departure of Ganapatrao Abba is a big shock to the Mohite-Patil family ...ub73

अकलूज : सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या नंतर मोहिते-पाटील परिवाराला आबांनी फार मोठा आधार दिला. आपण मंत्रीमंडळात काम करीत असताना आबांनी लोकहिताचे अनेक सल्ले आपल्याला दिले. त्यांचा सहकाराचा मोठा अभ्यास होता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची व वैयक्तिक मोहिते-पाटील घराण्याची फार मोठी हानी झाली आहे. आम्हा मोहिते-पाटील परिवाराला त्यांच्या जाण्याचा फार मोठा धक्का बसला आहे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आमदार गणपतराव देशमुख यांना श्रध्दांजली वाहिली आहे.  

लोकनेत्याचे एक पाऊल जनतेसोबत तर दुसरे पाऊल विकासाच्या दिशेवर असावे लागते. गणपतरावआबांचे व्यक्तिमत्व अगदी असेच होते; म्हणूनच सांगोला मतदारसंघातील प्रत्येक मतदारांशी आणि जनतेशी त्यांची वैचारिक गुंफण होती, असे स्पष्ट करून विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत आबाच निवडून आले पाहिजेत हाच ध्यास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता.

या प्रेमामुळेच नव्वदीच्या पुढे वय गेलेले असतानाही त्याच हिमतीने ते जनहिताचा कारभार करत होते. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांना खंबीरपणे साथ देणारी व्यक्ती म्हणून गणपतरावआबा देशमुख यांचे नाव अग्रस्थानी येते. सहकार महर्षींच्या निधनानंतर आबासाहेबांना पितृस्थानी मानत होतो. सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय जीवनात त्यांचा सल्ला आपण घेत होतो.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली राजकीय वाटचाल सुरू झाली. सांगोला विधानसभा मतदार संघात सन 1967 ते 2004 पर्यंत माळशिरस तालुक्‍यातील 21 गावे
समाविष्ट होती. या सर्व गावांमधून त्यांना मताधिक्‍य मिळवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर आपण कायम प्रयत्न केले. विधानसभा सभागृहात आम्ही दोघांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी एकच भूमिका घेऊन शेवटपर्यंत वाटचाल केली. 

जिल्ह्यांच्या सहकार क्षेत्रात सहकार महर्षींच्या बरोबरीने कै. सुधाकरपंत परिचारक, कै. ब्रह्मदेव माने आणि आबासाहेबांनी एका विचाराने संस्था नावारूपाला आणल्या होत्या. त्यांच्यासोबत आपल्याला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. आबासाहेब हे सोलापूर जिल्हाच नाहीतर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते होते. शेतकरी कामगार पक्षाच्या साम्यवादी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. गोरगरीब जनतेसाठी लोककल्याणकारी राज्य राबविले जावे हा त्यांचा ध्यास होता.

साधे राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांनी आयुष्यभर जपली. मंत्री असतानासुद्धा ते अत्यंत साधेपणानेच रहात असत. पद आज आहे उद्या नाही, राज्यकर्त्यांनी आपली सगळी शक्ती समाजाच्या विकासासाठी राबविली पाहिजे हा त्यांचा ध्यास असायचा. त्यांचा बराचसा प्रवास एसटीने असायचा आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या कार्यशैलीविषयी प्रचंड कुतूहल होते. आबांचे विधानसभेतील अस्तित्व सभागृहाचा बहुमान करणारे होते.

सभागृहातील त्यांचे प्रत्येक भाषण त्यांच्या व्यासंगाची साक्ष देत असे. प्रश्न समजावून घेणे, त्याचा चौफेर अभ्यास करणे आणि योग्य पद्धतीने सभागृहात मांडणे हे कौशल्य त्यांच्याकडे होते. अतिशय तरुण वयात सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे सोने त्यांनी केले. 54 वर्षे एखाद्या सभागृहाचे प्रतिनिधित्व करणे ही गोष्ट सामान्य नव्हती. त्यांच्या मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर ऋषीतुल्य असे प्रेम केले, असेही त्यांनी नमुद केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com