शिवाजी महाराज, रामदास स्वामींच्या भेटीचे ते शिल्प हटवा : श्रीमंत कोकाटे - Delete the sculpture of Shivaji Maharaj, Ramdas Swami's visit:says Srimant Kokate | Politics Marathi News - Sarkarnama

शिवाजी महाराज, रामदास स्वामींच्या भेटीचे ते शिल्प हटवा : श्रीमंत कोकाटे

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 डिसेंबर 2020

डॉ. कोकाटे म्हणाले,"छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत. शहरातील शिल्प बसविण्याबाबत नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे. या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे.'' 

सातारा : समाजातील काही सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या भेटीचे शिल्प उभारलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामींच्या भेटीचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या रामदास स्वामींचे शिल्प तत्काळ हटवून शिल्प बसविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आज केली. 

विविध पुरोगामी समतावादी संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पार्थ पोळके, अशोक गायकवाड, चंद्रकांत खंडाईत, अमर गायकवाड उपस्थित होते. या प्रकरणी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी, नगरपालिका, बांधकाम भवन या कार्यालयात निवेदन देण्यात आली. 

डॉ. कोकाटे म्हणाले,"छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत. शहरातील शिल्प बसविण्याबाबत नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे. या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे.'' 

पार्थ पोळके म्हणाले,"छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पध्दतीने दाखवून भाजप इतिहासाचे विद्रुपिकरण करत आहे. या प्रकरणाबाबत पुरोगामी विचाराच्या सर्व संघटना एकत्रित येत लढा देणार आहेत.'' 

एक महिन्याचा "अल्टिमेटम' 
शहरात उभारण्यात आलेल्या शिल्पातील रामदास स्वामी यांचा पुतळा हटवून त्या ठिकाणी जिजाऊंचा पुतळा बसविण्याची मागणी पुरोगामी संघटनांनी केली आहे. तसेच संबंधित शिल्पातील रामदास स्वामींचा पुतळा एक महिन्यात हटवावा अन्यथा आम्ही आमच्या पध्दतीने पुतळा काढू, असा इशारा संघटनांनी दिला आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख