Decision of 'Ek Gaon Ek Ganpati' in the Home Minister's Patan Taluka | Sarkarnama

गृहराज्यमंत्र्यांच्या तालुक्यात 'एक गाव एक गणपती' चा निर्णय 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 26 जुलै 2020

गणेशोत्सव काळातील खर्चाला फाटा देत गणेशोत्सवाचा खर्च कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज पाटणमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाला.

सातारा : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय पाटण तालुक्यातील जनतेने घेतला आहे. तालुक्यामध्ये 'एक गाव एक गणपती' बसवून गणेशोत्सव काळातील खर्चाला फाटा देत गणेशोत्सवाचा खर्च कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज पाटणमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाला.  

कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव ग्रामीण भागात 'एक गाव एक गणपती' बसवून राज्यातील ग्रामीण भागातील जनतेने साजरा करावा, असे आवाहन गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी केले आहे.

त्याची सुरुवात त्यांच्या पाटण मतदारसंघातून होण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात सर्वपक्षीय बैठक झाली. बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त करताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मांडलेली संकल्पना उत्कृष्ट असून कोरोना संकटकाळात गणेशोत्सवात पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. याकरीता 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना सर्व गावांनी राबवावी, असे आवाहन सर्वांनी केले. 

कोरोना काळात राज्याच्या विविध भागांत जाऊन गृहराज्यमंत्री हे तेथील प्रशासनाला सतर्क करीत राज्यातील विविध भागातील जनतेची मंत्री म्हणून ते काळजी घेत आहेत. तसेच पाटण मतदारसंघातील जनतेवरही त्यांचे विशेष लक्ष असल्याने गत चार महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाटण मतदारसंघात रोखण्याकरीता त्यांचे कसोशिने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येणारा गणेशोत्सव हा पाटण तालुक्यात 'एक गाव एक गणपती'ने साजरा व्हावा याला आमचा सर्वांचा पाठींबा आहे.

तालुक्यातील प्रत्येक गावात यासंदर्भात प्रशासनाच्या मदतीने आम्ही सर्वजण जागृती करु अशा प्रतिक्रिया सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. शंभूराज देसाई म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून या संसर्गजन्य रोगाचा सामना करण्याकरीता जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय आपण सर्वजण करीत आहोत. गेली चार महिने आपण सर्वजण या संकटाचा सामना करीत आहोत.

येऊ घातलेला सार्वजनिक गणेशोत्सव कशा पध्दतीने साजरा करायचा याच्या मार्गदर्शक सुचना राज्य शासनाने यापुर्वीच दिल्या आहेत. गर्दीत जाणे टाळणे हा एकमेव कोरोना रोखण्याचा उपाय असल्याने यंदाचा गणेशोत्सव हा विना गर्दीचा होण्याकरीता 'एक गाव एक गणपती' हि संकल्पना राबवावी. त्याची सुरुवात पाटण मतदारसंघातून करावी, अशी विनंती त्यांन जनतेला केली होते. त्यास सर्वांनी प्रतिसाद देत पाठींबा जाहिर केला.  

या बैठकीस काँग्रेस पक्षाचे हिंदुराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे फत्तेसिंह पाटणकर, शिवसेना पक्षाचे जयवंतराव शेलार, महाराष्ट्र नव निर्माण सेना पक्षाचे गोरख नारकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्राणलाल माने, बहुजन समाजवादी पक्षाचे शिवाजी कांबळे, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव  प्रमुख उपस्थित होते.

 

सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्वाच्या खर्चाला फाटा देत कोरोनाचा सामना करण्याकरीता कोरोनाबाधित गावांत मास्क, सॅनिटायझर, प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळया, गोर-गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करावे. तसेच आरोग्य विषयक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गणेश मंडळांना केले आहे.
 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख