सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आढावा घेऊन रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. शाळा सुरुच ठेवल्या जाणार आहेत, मात्र, शाळांची पथकाव्दारे अचानक तपासणी करण्याचा आणि बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंह हे ऑनलाईन तर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या, उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण, उपलब्ध सेवा, बेडस,औषधे यांची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली. यानंतर ते म्हणाले, एक फेब्रुवारीपासून जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्ह रेट 17.02 टक्के असा असून बरे होण्याचे प्रमाण 95.15 टक्के इतका आहे. रात्री फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याने शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री अकरा वाजता बंद करावीत.
मात्र, यातून महामार्गांवरील हॉटेल्स, रेस्टॉरंट वगळावीत. लग्नासाठी वधू पन्नास तर वराकडील पन्नास अशा शंभर लोकांनाच उपस्थित राहावे. याबाबतच्या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेशही त्यांनी बैठकीत दिले.राज्यासह जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करणे तसेच सुरक्षित अंतराची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
बाजाराच्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते यांच्यात सुरक्षित अंतर राखण्यासाठी पालिका, ग्रामपंचायतीने पुढकार घेण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले. महाविद्यालय, शाळा सुरु झाल्या असून महाविद्यालय, शाळा व्यवस्थापन सुचनांचे पालन करतात की नाही, याची याची पोलीस विभाग व जिल्हा परिषदेने अचानक पाहणी करण्याचे तसेच उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी.
आजपर्यंत जिल्ह्यात 71 टक्के लसीकरण झाले असून खासगी डॉक्टर, त्यांचे कर्मचारी लस घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही सुरक्षीत असून खासगी डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आवानही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
मेळावे,यात्रा, जत्रांवर बंदी
कोरोना संसर्ग वाढू नये याकरिता कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक मेळाव्यांना, यात्रा, जत्रांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेश देतानाच यात्रा, जत्रेवर निर्बंध असलेतरी नियंत्रीत व्यक्तींच्या उपस्थित आठवडाभरानंतर परिस्थितीचे अवलोकन करून पुढील निर्णय घेण्यात येतील असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

