'महाविकास'च्या बदनामीसाठी भाजपच्या नेत्यांकडून टीका : शंभूराज देसाई - Criticism from BJP leaders for defaming 'Mahavikas': Shambhuraj Desai | Politics Marathi News - Sarkarnama

'महाविकास'च्या बदनामीसाठी भाजपच्या नेत्यांकडून टीका : शंभूराज देसाई

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 जुलै 2021

चित्रा वाघ यांना गृहराज्यमंत्र्यांचा एवढा राग का, याविषयी मंत्री देसाई म्हणाले, हा संशोधनाचा भाग असेल भाजपच्या नेत्यांना काहीही काम उरलेले नाही. जनतेत संभ्रम निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम ते करत आहेत.

सातारा : महिला अत्याचारांच्या घटनांबाबत साताऱ्याचे पोलिस दल संवेदनशील आहे. चित्रा वाघ यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे पोलिस दलासह गृहराज्यमंत्री व पालकमंत्र्यांवर टीका केली आहे. सध्या भाजपच्या नेत्यांना काहीही काम उरलेले नाही. जनतेत संभ्रम निर्माण करून लोकांची दिशाभूल करून शासन व महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांच्या टीकेकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असे प्रतिउत्तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना दिले आहे. Criticism from BJP leaders for defaming 'Mahavikas': Shambhuraj Desai

चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपला प्रतिउत्तर देण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी साताऱ्यात गेल्या दोन वर्षांच्या तुलने महिलांवरील अत्याचाराच्या घटनात घट झाल्याचे सांगितले. मंत्री देसाई म्हणाले, धुमाळ प्रकरणात संबंधित शिक्षिकेने पोस्टाच्या माध्यमातून लेखी तक्रार दिली होती. ती तक्रार विशाखा समितीकडे पाठविली. त्याची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : तेजस्वी यादव उट्टे काढणार; नितीश कुमारांना देणार धक्का

पोलिसांनी धुमाळला अटक केल्यानंतर हा विषय आमच्या विभागाकडे आला. २६ जूनला संबंधित शिक्षिकेने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या दुसऱ्या दिवशी २७ जूनला पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर आजारी असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले. त्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळाल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात दाखल केले होते. त्याला न्यायालयाने जामीनावर सोडले आहे.

आवश्य वाचा : पडळकरांना जाब विचारता; मग गायकवाडांना मोकळे का सोडता!

या प्रकरणात पोलिस दलाकडून कोठेही ढिलाई झालेली नाही. या संपूर्ण केसचा तपास सहायक पोलिस निरिक्षक चौधरी करत आहेत. तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षकांना मी आदेश दिले आहेत. सातारा विभागाच्या सहायक पोलिस अधीक्षक आचल दलाल या केसवर बारकाईने लक्ष ठेवतील. एकही त्रुटी व अपूर्णता या प्रकरणात ठेवली जाणार नाही. महिलांवरील अत्याचाराबाबत पोलिस संवेदनशील आहेत.

महिलांची तक्रार आल्यास तात्काळ कारवाईचे आदेश मी यापूर्वीही दिले आहेत. त्यामुळे काहीही नसताना प्रत्येक गोष्टीचे राजकिय भांडवल करायचे आणि महाविकास आघाडी सरकार बदनाम करायचे काम त्यांनी सुरू केले आहे.  गेल्या दोन वर्षाची तुलना करता केली. २०२० मध्ये महिलांवरील अत्याचाराचे ४७ गुन्हे कमी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. गृहराज्य मंत्री सुरक्षित नाहीत हा जावई शोध त्यांनी कुठून लावला, असे सांगून मंत्री देसाई म्हणाले, पाळत ठेवणे आणि सुरक्षित नसणे या दोन भिन्न बाजू आहेत.

काही लोक संशयास्पद रित्या वावरतात. रेकॉर्डिंग करून त्याचा वापर करतात. मुळात आमचे सरकार व गृहखाते महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी चौवीस तास सक्रिय आहे. तसेच महिलांची सुरक्षिततेला ठाकरे सरकारने प्राधान्य दिलेले आहे. गृहराज्यमंत्री समोर येत नाहीत. त्यांचा कायदा सुव्यवस्था राखण्यात सहभाग नसतो, असा आरोप सौ. वाघ यांनी केल्याविषयी विचारले असता, मंत्री देसाई म्हणाले, पहिल्या लॉकडाउनमध्ये राज्यातील तेरा जिल्ह्यात जाऊन मी स्वतः आढावा घेतला होता.

दुसऱ्या लॉकडाउनमध्ये नऊ जिल्ह्यात जाऊन कायदा सुव्यवस्था व पोलिस दलाच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देणारे आहे. उपसभापती निलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबतीत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी काही निर्देश सभागृहात गृहमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मी  नऊ जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन मॉडेल कार्यप्रणाली तयार करण्याचे काम सुरू करण्याची सूचना होती.

त्यानुसार सातारा जिल्ह्यात सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल याबाबतचे प्रेझेंन्टेशन तयार करत आहेत. ते पूर्ण झाल्यावर ते आम्ही येत्या अधिवेशनात वेळ घेऊन उपसभापतींकडे महिला सुरक्षिततेबाबतच्या मॉडेलचे सादरीकरण करणार आहोत. यामध्ये त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव करून मॉडेल प्लॅन करून त्याची अंमलबजावणी करणार आहोत. चित्रा वाघ यांना गृहराज्यमंत्र्यांचा एवढा राग का, याविषयी मंत्री देसाई म्हणाले, हा संशोधनाचा भाग असेल भाजपच्या नेत्यांना काहीही काम उरलेले नाही. जनतेत संभ्रम निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम ते करत आहेत. मुळात चित्रा वाघ या अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलल्या. शासन व महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करण्याचे काम आम्ही करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

 ॲक्शनला रिॲक्शन.. म्हणजेच दगडफेक...
शरद पवार साहेबांसारख्या नेत्यांवर बोलणे पडळकरांना शोभत नाहीत. ते महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्यावरील आक्षेपार्य विधाने खपवून घेतली जाणार नाहीत. ॲक्शनला रिॲक्शन म्हणजेच पडळकरांच्या गाडीवर झालेली दगडफेक आहे. त्यांनी यातून बोध घ्यावा. त्यांनी यापुढे भान ठेऊन बोलावे, असा सल्ला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख