शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवरच खंडणीचा गुन्हा - The crime of ransom only against forest workers | Politics Marathi News - Sarkarnama

शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवरच खंडणीचा गुन्हा

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 6 सप्टेंबर 2020

गावितने ओंकारला कारमध्ये बसविले. सोनावले व एक अनोळखी व्यक्ती तेथेच थांबले. कारमधून साताऱ्याकडे येताना गावितने "तू मला एक लाख रुपये दे. आम्ही तुला सोडून देतो. नाही तर तुझ्यावर प्राण्यांची शिकार करण्याचा गुन्हा दाखल करतो' असे म्हणून घरातील लोकांना फोन लावण्यास सांगितले.

नागठाणे (ता. सातारा) : पिरेवाडी (भैरवगड, ता. सातारा) येथील युवकास शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून करिअर खराब करतो, अशी धमकी देऊन 25 हजार
रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आणखी दोन अनोळखी व्यक्तींचाही समावेश आहे.
 
बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाचे श्री. सोनावले व श्री. गावित अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सोमवार (ता. ३१, ऑगस्ट) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पिरेवाडी (भैरवगड) येथील ओंकार शिंदे हा युवक त्याच्या शिवारातील पिकांची माकडे नासाडी करत आहेत, अशी माहिती
मिळाल्यामुळे हातात छोटी काठी घेऊन गेला.

यावेळी तेथे वन विभागाचे कर्मचारी गावित, सोनावले व दोन अनोळखी व्यक्ती आल्या. या सर्वांनी ओंकारला पकडले. त्यातील गावितने ओंकारला कारमध्ये बसविले. सोनावले व एक अनोळखी व्यक्ती तेथेच थांबले. कारमधून साताऱ्याकडे येताना गावितने "तू मला एक लाख रुपये दे. आम्ही तुला सोडून देतो. नाही तर तुझ्यावर प्राण्यांची शिकार करण्याचा गुन्हा दाखल करतो' असे म्हणून घरातील लोकांना फोन लावण्यास सांगितले.

वडिलांचा फोन न लागल्याने ओंकारकडून चुलत भाऊ राजेंद्र शिंदे याचा नंबर घेऊन त्याला फोन केला. "ओंकारला शिकार करताना पकडले आहे. एक लाख रुपये घेऊन वडिलांना पाठवून दे. नाही तर ओंकारचे करिअर खराब होईल' अशी त्यालाही धमकी दिली. या दरम्यान गावितने ओंकारला साताऱ्यात फिरवून रात्री वन रोपवाटिकेत डांबून ठेऊन लाकडी दांडक्‍याने मारहाण केली.

कोऱ्या कागदावर त्याच्या सह्या घेतल्या. त्यानंतर त्याला खिंडवाडी येथे महामार्गानजीक असलेल्या अप्रतिम लॉज येथे नेऊन पुन्हा डांबून ठेवले. रात्री उशिरा वडील श्‍यामराव शिंदे, अमोल गायकवाड, सोनावले व एक अनोळखी व्यक्ती हे खिंडवाडी अप्रतिम लॉजवर आले. तेथे वडिलांच्या व अमोल गायकवाडच्या सह्या घेत दुसऱ्या दिवशी 30 हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले.

दुसऱ्या दिवशी जमा झालेले पैसे घेऊन गावातील काही लोकांसह श्‍यामराव शिंदे यांनी त्यांना जमा झालेले 25 हजार रुपये दिले. ओंकार शिंदे याने याबाबात फिर्याद दिली आहे. त्यानंतर बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी तातडीने हालचाली करत दोन्ही  वन कर्मचाऱ्यांसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. 

पोलिसांची तत्परता...

या घटनेचा तक्रार अर्ज ओंकार शिंदे याने सातारा वन विभाग, पोलिस उपअधिक्षक समीर शेख यांच्याकडे दिला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून समीर शेख यांनी याबाबत तक्रार अर्ज बोरगाव पोलिसांकडे वर्ग करून सखोल तपासाचे आदेश दिले होते. बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी तत्काळ हालचाल करत या संपूर्ण प्रकरणाची स्वतः चौकशी सुरू केली होती. त्यानंतर रात्री उशीरा त्यांनी चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख