कोरोना इफेक्ट : साताऱ्यातील नववीपर्यंतच्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद 

सर्व सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, जत्र, आदी कार्यक्रम व परिषदा बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु आदी सेवनास मनाई असेल. अंत्यविधीच्या कार्यक्रमास 20 व्यक्तींना सामाजिक अंतराची अटीवर परवानगी असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Corona effect: Schools up to 9th in Satara closed till March 31
Corona effect: Schools up to 9th in Satara closed till March 31

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता कडक निर्बंध लागू करणे आवश्‍यक असल्याने उद्या (गुरूवार) पासून ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील नववीपर्यंतच्या सर्व शाळा, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्युट, कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्युट बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. या कालवधीत ऑनलाइन शिक्षणास परवानगी असेल.

निवासी शाळा, वसतीगृह, आश्रमशाळा, दहावी व त्यापुढील सर्व महाविद्यालये व शैक्षणिक संस्था सुरू ठेवण्यास परवानगी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मध्यंतरी काही शाळांतील विद्यार्थी बाधित आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

कोविडचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध कडक करणे आवश्‍यक झाले आहे. त्यानुसार आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवे आदेश लागू केले आहेत. यामध्ये जिल्ह्यात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू असून यामध्ये अत्यावश्‍यक सेवा व महामार्गावरील वाहतूक चालू राहणार आहे.

तसेच उद्या (गुरूवार) पासून 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील नववी व नववीच्या खालील सर्व शाळा, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्युट, कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टिट्युट बंद राहणार आहेत. पण निवासी शाळा, वसतीगृहे, आश्रमशाळा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची वसतीगृहे, दहावी व त्यापुढील सर्ववर्ग, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था चालू ठेवण्यास परवानगी असेल.

ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेत 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण उपक्रम, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था सुरू राहतील. त्यासाठी नियमावलीचे पालन करावे लागेल.

सर्व सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, जत्र, आदी कार्यक्रम व परिषदा बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु आदी सेवनास मनाई असेल. अंत्यविधीच्या कार्यक्रमास 20 व्यक्तींना सामाजिक अंतराची अटीवर परवानगी असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

लग्न 50 लोकांच्या उपस्थितीतच

जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमिक रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाच्या कार्यात जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच (भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी, वाढप्यांसह) उपस्थित राहण्यास परवानगी राहील. लग्न कार्याच्या ठिकाणच्या पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याचा ना हरकत परवाना तसेच तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. फक्त मंगल कार्यालयात (हॉलमध्ये) सनई-वाद्यास परवानगी राहील. कार्यालयाच्या बाहेरील परिसरात कोणत्याही प्रकारचे बॅन्जो-बॅंड, डिजे अथवा फटाके वाजविण्यास पूर्णपणे मनाई राहील, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com