सहकारी संस्थांच्या निवडणूका 31 मार्चपर्यंत स्थगित  - Co-operative elections postponed till March 31 | Politics Marathi News - Sarkarnama

सहकारी संस्थांच्या निवडणूका 31 मार्चपर्यंत स्थगित 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

जिल्हा बॅंकेची निवडणूक घेण्यासंदर्भात आज (गुरूवारी) निर्णय होणार आहे. या याचिकेवर निवडणूक घेण्याचा निकाल दिल्यास पुणे व सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे. पण कोरोनाचा संदर्भ घेतल्यास ही निवडणूक पुढे ढकलली जाण्याची ही शक्‍यता आहे. परिणामी न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. 

सातारा : कोरोनाच संसर्ग वाढल्याने शासनाने सहकारी संस्थांच्या सर्व निवडणूका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्थांच्या निवडणूक आहे त्या प्रक्रियेवर थांबविण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. पण सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीसंदर्भात उच्च न्यायालयातील याचिकेवर आज (गुरूवार) निर्णय होणार असल्याने सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूकीची प्रक्रिया पुढे चालू राहण्याची शक्‍यता आहे. 

सहकाराच्या निवडणूका गेल्या वर्षापासून स्थगितीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. सुरवातीला मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तीन महिने पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर 18 मार्च, 17 जून, 28 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यानंतर डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली गेली. तर त्यानंतर 16 मार्चच्या आदेशानुसार 31 मार्च 2021पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या.

मात्र, यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्याने शासनाने 16 जानेवारचा आदेश रद्द करून पुन्हा मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार सातारा जिल्हा बॅंकेच्या ठरावाची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून कच्ची मतदार यादी करण्याचे काम सुरू होते. पण आज शासनाने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने सहकारी संस्थांच्या निवडणूका 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे आदेश कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी जिल्हा उपनिबंधकांना पाठविले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 250 पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी संस्था वगळून उर्वरित सर्व संस्थांची निवडणूक 31 मार्चपर्यंत पुढे गेली आहे. पण सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे.

या यचिकेवर काल सुनावणी झाली होती.  मध्ये न्यायालयाने शासनाचे बाजू रद्द केली आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक घेण्यासंदर्भात आज (गुरूवारी) निर्णय होणार आहे. या याचिकेवर निवडणूक घेण्याचा निकाल दिल्यास पुणे व सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे. पण कोरोनाचा संदर्भ घेतल्यास ही निवडणूक पुढे ढकलली जाण्याची ही शक्‍यता आहे. परिणामी न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. 
 
कृष्णा कारखान्याची निवडणूक होणार....
कृष्णा कारखान्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश काढून निवडणूक घेण्याची सूचना सहकार विभागाला केली होती. त्यामुळे आजच्या शासनाच्या आदेशाचा परिणाम कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीवर होणार नाही. कृष्णाची निवडणूक होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख