पवारसाहेबांसोबत चिंब भिजलो; केवळ पावसात नव्हे तर सातारकरांच्या प्रेमात : श्रीनिवास पाटील - Chimb soaked with Pawar; Not only in the rain but in the love of Satarkar Says NCP MP Srinivas Patil | Politics Marathi News - Sarkarnama

पवारसाहेबांसोबत चिंब भिजलो; केवळ पावसात नव्हे तर सातारकरांच्या प्रेमात : श्रीनिवास पाटील

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

पवार साहेब व्यासपीठावर गेल्याबरोबर पावसाची धो-धो बरसात सुरु झाली. मात्र, तशा वातावरणातही पवार साहेबांनी सभेला संबोधित केले. त्यास लाखोंच्या जनसमुदयाने दिलेला प्रतिसाद अचंबित करणारा होता. गेल्या साठ वर्षात ज्यांची- माझी मैत्री होती, त्या एका कर्तबगार पुरुषाच्या मागे सातारा जिल्हा किती ठामपणे उभा आहे याची कल्पना त्या दहा मिनिटांमध्ये आली.

 सातारा : रात्री उशीरा झालेल्या सभेवेळी पावसाची भुरभूर सुरु झाली होती. त्यामुळे उपस्थित लोकांना शंका होती की, पवार साहेब बोलतील का नाही ? पवार साहेब व्यासपीठावर गेल्याबरोबर पावसाची धो-धो बरसात सुरु झाली. मात्र, साहेबांनी पुढे येऊन केलेल्या आपल्या ओघवती भाषेत दहा ते पंधरा मिनिटे भाषण करून कोणत्याही परिस्थितीत आपण सर्वांनी राष्ट्रवादीच्या मागे उभे राहिले पाहिजे, हे आवाहन मतदारांना केले. त्यातून मतदार आणि जमलेल्या जनसमुदायामध्ये चैतन्य संचारले. कोणीही जागचे हालले नाही. गेल्या साठ वर्षात ज्यांची- माझी मैत्री होती, त्या एका कर्तबगार पुरुषाच्या मागे सातारा जिल्हा किती ठामपणे उभा आहे याची प्रचिती त्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आली, अशा शब्दात साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी पावसातील सभेच्या आठवणींना उजाळा दिला. 

 महाराष्ट्र विधानसभा व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या सातारा येथील पावसातील ''त्या'' सभेच्या आठवणी आजही तशाच ताज्या आहेत, सांगून श्रीनिवास पाटील म्हणाले, ऑक्टोबर २०१९ ला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. ही निवडणूक देशातील एक ऐतिहासिक निवडणूक ठरली.

मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे ओपिनियन पोल, मिडिया रिपोर्ट यांनी निर्माण केलेल्या वातावरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सर्वजण साशंक होते. राष्ट्रवादीचे जहाज बुडणार असे समजून अनेकजण ऐनवेळी सोडून गेले होते. अशा परिस्थितीत केवळ एकजण आत्मविश्वास दाखवून ठामपणे उभे होते, ते म्हणजे आमचे नेते शरद पवार साहेब. योगायोगाने विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती.

या मतदारसंघातून तीनवेळा निवडून आलेले बलाढ्य उमेदवार समोर होते. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीने कोणाला उभे करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. पवार साहेबांचा मला आदेश आला. या बिकटसमयी बाकी काही विचार न करता फक्त साहेबांच्या मागे मी ठामपणे उभा राहिलो. आणि त्याच एका भूमिकेतून मी हे आव्हान स्वीकारले होते. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचाराच्या सभा सातारा व कराड येथे झाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर पवार साहेबांची एक सभा १८ ऑक्टोबरला सातारा येथे ठरली.

पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे सायंकाळी आमची सभा चालली होती. पावसाची भुरभूर सुरु झाली होती. त्यानंतर साताराला पोहोचायला आम्हाला उशीर झाला. पवार साहेब व्यासपीठावर गेल्याबरोबर पावसाची धो-धो बरसात सुरु झाली. मात्र, तशा वातावरणातही पवार साहेबांनी सभेला संबोधित केले. त्यास लाखोंच्या जनसमुदयाने दिलेला प्रतिसाद अचंबित करणारा होता. गेल्या साठ वर्षात ज्यांची- माझी मैत्री होती, त्या एका कर्तबगार पुरुषाच्या मागे सातारा जिल्हा किती ठामपणे उभा आहे याची कल्पना त्या दहा मिनिटांमध्ये आली.

त्या क्षणी भारावलेल्या वातावरणात माझी भावना एवढीच होती की, आपण आपल्या नेत्याच्या, मित्राच्या हाकेला पुन्हा एकदा ओ देऊन उभे राहिलो आहोत. आपला नेता कोसळणाऱ्या पावसात देखील ठामपणे उभा आहे. मग निवडणुकीचा निकाल काहीही लागो. सातारा जिल्ह्याची लढाऊ वृत्ती, पुरोगामी परंपरा, कै. यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण याचे आम्ही पालन मनापासून युवक काँग्रेस काळापासून करत आलो. हाच माझ्यासाठी आनंदाचा दिवस होता.

त्यवेळी मी चिंब भिजलो फक्त पावसात नव्हे तर सातारकर जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमात. पवार साहेब आणि आमच्यात गेली साठ वर्षे स्नेह होता, त्याची जोपासना आम्ही आयुष्यभर केली. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्मृतीला वंदन करून ठामपणे ही निवडणूक लढवली. जनतेनेही आमच्या पदरात यशाचे सूप भरभरून ओतले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख