मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कोयनेची महती समजून घेणार - Chief Minister Uddhav Thackeray and Aditya Thackeray will visit Koyna Dam tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कोयनेची महती समजून घेणार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 डिसेंबर 2020

कोयना प्रकल्पात कर्मचारी व अधिकारी वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. कोयना प्रकल्पात निधीची चणचण भासत असल्याचे कारण पुढे करत कोयनेत कामे झालेले नाहीत. त्यामुळे कोयना वसाहतीची दुरावस्था झाली आहे. मुख्यमंत्र्यासह अन्य मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नेहमीच निधीची चणचण भासणाऱ्या परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरु आहे.

कोयनानगर : कोयना धरण व व पोफळी येथील जलविद्युत प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरूवारी) कोयना व पोफळीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित असणार आहेत.   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने कोयनानगर येथे सकाळी दहा वाजता आगमन होईल. त्यानंतर शासकिय वाहनाने पोफळी (ता. चिपळूण) कडे जातील. सकाळी अकरा वाजता ते पोफळी येथे पोहोचून तेथील महाजनको प्रकल्पाची पहाणी करतील. पहाणी झाल्यावर ते पुन्हा कोयनानगरकडे येतील.

दुपारी बारा वाजता त्यांचे पुन्हा कोयना धरणावर आगमन होईल. ते धरणाची पहाणी करतील. त्यानंतर साडे बाजरा वाजेपर्यंत शासकिय विश्रामगृहात राखीव असेल. पावणे एकच्या सुमारास ते कोयनानगर हेलिपॅडवरून मुंबईला रवाना होतील. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने कोयनानगर परिसरातील रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. या परिसराचा लुक बदलला आहे.

राज्याला अब्जावधी रुपयांचा महसूल मिळवुन देणारे व राज्यात हरितक्रांतीला चालना देणारे कोयना धरण व जलविद्युत आहे. दहा वर्षापासून कोयना धरण व कोयना प्रकल्प असुविधांचा सामना करत आहे. शासनाकडून या प्रकल्पाला सहकार्य नसल्यामुळे त्याला घरघर लागली आहे. अनेक बहुउद्देशीय कामे ठप्प असल्याने कोयना प्रकल्पाची अवस्था किल्लारी प्रकल्पासारखी झाली आहे.

कोयना प्रकल्पात कर्मचारी व अधिकारी वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. कोयना प्रकल्पात निधीची चणचण भासत असल्याचे कारण पुढे करत कोयनेत कामे झालेले नाहीत. त्यामुळे कोयना वसाहतीची दुरावस्था झाली आहे. मुख्यमंत्र्यासह अन्य मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नेहमीच निधीची चणचण
भासणाऱ्या परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरु आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख