केंद्राने देशभरात मोफत लसीकरण करावे; उत्पादकांकडून होणारा लसींचा व्यापार थांबवा....

नाना पटोले म्हणाले, जगाच्या पाठीवर ज्या देशांनी ७०-८० टक्के लसीकरण केले ते देश कोरोनामुक्त झाले, तिथला लॉकडाऊन संपला आणि विशेष म्हणजे हजारो लोकांचे जीव वाचले. यातून भारत सरकारने काही बोध घ्यायला हवा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे काही नियोजन केले असते तर निरपराध लोकांचे जीव वाचले असते.​
Central government should vaccinate free corona across the country: Nana Patole
Central government should vaccinate free corona across the country: Nana Patole

मुंबई : देशभरात कोरोनाने उद्भवलेली परिस्थिती चिंताजनक आहे. दररोज दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. रुग्णालयात बेड्सही मिळत नाहीत. हे केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे परिणाम आहेत. देशात फक्त दोन कंपन्यांना लस उत्पादनाची परवानगी दिली ती पुरेशी नव्हती.  केंद्राला १५० रुपये, राज्य सरकारला ४०० रुपये तर खाजगी  रुग्णालयांना ६०० रुपये लसीसाठी मोजावे लागणार आहेत. राष्ट्रीय आपत्तीत या  कंपन्यांनी चालवलेली नफेखोरी थांबवावी आणि देशभर सर्वांना मोफत लस देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. या शिष्टमंडळात आ. शरद रणपिसे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चौधरी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, महापालिका गटनेते आबा बागुल, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, अरविंद शिंदे, संजय बालगुडे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, जगाच्या पाठीवर ज्या देशांनी ७०-८० टक्के लसीकरण केले ते देश कोरोनामुक्त झाले, तिथला लॉकडाऊन संपला आणि विशेष म्हणजे हजारो लोकांचे जीव वाचले. यातून भारत सरकारने काही बोध घ्यायला हवा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे काही नियोजन केले असते तर निरपराध लोकांचे जीव वाचले असते. तसे न करता मार्चच्या पहिल्या आठवड्यात देशातील कोरोना संपला असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. 

त्यानंतर राज्य सरकारांनी त्यांची कोविड सेंटर बंद केली. सर्वजण गाफील राहिले आणि आता देशभर मृत्यूचे तांडव दिसत आहे. दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी २६ जण मरण पावले. दिल्लीत ही स्थिती आहे तर देशात काय स्थिती असेल. १३० कोटी जनतेसाठी ३०० कोटी लसींची गरज आहे, एवढी मोठी गरज केवळ सीरम व भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडून भागणे शक्य नव्हते त्यासाठी आणखी उपाय करण्याची गरज होती. लसीकरणासंदर्भात राष्ट्रीय धोरण ठरवले असते तर रेमडेसीवीर, ऑक्सीजनची एवढी गरजच भासली नसती. याला केवळ केंद्राचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. 

कोरोनासंदर्भात सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी वारंवार केंद्र सरकाला विधायक सुचना केल्या पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मोदी सरकारची ही आडमुठी भूमिकाच जनतेच्या जिवावर बेतली आहे. आज राज्यांना लसीचा पुरवठा मागणीनुसार होत नाही. महाराष्ट्राला इतर भाजपशासित राज्यांपेक्षा कमी लसी पुरवल्या जातात. तरीही महाराष्ट्राने देशात सर्वात जास्त लसीकरण केले आहे. यापुढे लसींचा ५० टक्के साठा केंद्र सरकारला तर ५० टक्के राज्यांना मिळणार आहे. या मधून राज्या-राज्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. 

हे होऊ नये याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्यामुळे ही जबाबदारीही झटकून केंद्राने राज्यांना गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र सरकारने परदेशी लस आयात करण्याची परवानगी मागितलेली आहे. केंद्र सरकार जबाबदारी झटकत असेल पण महाराष्ट्र सरकारने जबाबदारी झटकू नये ही काँग्रेसची भूमिका आहे. आणि त्याच पद्धतीने ही मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. त्यालाही तात्काळ मान्यता द्यावी. अशा मागण्या केंद्राकडे केल्याचे पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com