पिंपरी पाठोपाठ आता फलटणमध्ये रेमडेसिवरचा काळाबाजार; वॉर्डबॉयसह चौघांना अटक

या प्रकरणी चौघांनाही अटक झाली आहे. रेमडेसिवर इंजेक्‍शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचे रॅकेट कार्यरत असून, या टोळीच्या सूत्रधार कोण, याचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे.
Black market of remedesivir injection in Phaltan; Four arrested with Wardboy
Black market of remedesivir injection in Phaltan; Four arrested with Wardboy

फलटण शहर : काही दिवसांपूर्वी पिंपरी येथील एका हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवरचा  काळाबाजार उघड झाला होता. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) शहरातही रेमडेसिवरचा काळा बाजर करणाऱ्या टोळीला अन्न व औषध प्रशासनाच्या (Food And Drug department) अधिकाऱ्यानी रंगेहाथ पकडले. कोरोनाबाधित रुग्णांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेत अवैधपणे ३५ हजार रुपये किमतीस रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन (Remedesivir injection) विकणाऱ्या टोळीतील चौघांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये फलटण शहरातील सुविधा हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयचाही समावेश आहे. Black market of remedesivir injection in Phaltan; Four arrested with Wardboy

फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांना फलटण येथील सुविधा हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय सुनील विजय कचरे हा रेमडेसिवर इंजेक्‍शन छापील किमतीपेक्षा जास्त भावाने विकून काळाबाजार करीत असल्याची माहिती मिळाली होती. याची माहिती किंद्रे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांना दिली. फलटण शहर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम यांना बनावट गिऱ्हाईक बनवून कचरे याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला.

तेव्हा त्याने आपल्याकडे रेमडेसिवर इंजेक्‍शनची एक बाटली असून, प्रत्येक बाटलीची ३५ हजार रुपयांना विक्री करीत असल्याचे सांगितले. तेव्हा कदम यांनी रेमडेसिवर इंजेक्‍शनची बाटली खरेदी करण्यास होकार दिला. तेव्हा कदम यांना तातडीने एका हॉस्पिटलच्या पाठीमागे लक्ष्मीनगर येथे येण्यास सांगितले. ते तेथे गेले असता तेथून काही अंतरावर एका दुचाकीवर कचरे सहकाऱ्यांसह बसला होता. कदम यांनी तेथे जावून त्याच्याकडून इंजेक्‍शन घेतले व आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू केला.

त्याचवेळी तेथे सापळा लावून बसलेले पोलिस, अन्न निरीक्षक व पंच यांनी तेथे छापा मारला. पोलिसांची चाहूल लागताच कचरे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांनी आपली नावे सुनील विजय कचरे (वय 38, वॉर्डबॉय, सुविधा हॉस्पिटल, फलटण, रा. नेर, ता. खटाव) व अजय सुरेश फडतरे (वय 34, रा. पिंप्रद, ता. फलटण) असे असल्याचे सांगितले. अधिक चौकशीत हे इंजेक्‍शन प्रवीण मिस्त्री तथा प्रवीण दिलीप सापते (रा. घाडगेवाडी, ता. फलटण) याच्याकडून आणल्याचे सांगितले.

तेव्हा तातडीने पोलिस पथक पाठवून प्रवीण सापते यास ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने हे इंजेक्‍शन निखिल अनिल घाडगे (रा.अनपटवाडी, ता. खटाव) यांच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार निखिल घाडगेसही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चौघांनाही अटक झाली आहे. रेमडेसिवर इंजेक्‍शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचे रॅकेट कार्यरत असून, या टोळीच्या सूत्रधार कोण, याचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com