शंभर कोटी आणि मंत्रीपद; तरी शशिकांत शिंदेंनी धुडकावली ऑफर - BJP's offer to Shashikant Shinde during elections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

शंभर कोटी आणि मंत्रीपद; तरी शशिकांत शिंदेंनी धुडकावली ऑफर

राजेंद्र वाघ
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

 पश्चिम महाराष्ट्रातील तुमच्यासारख्या प्रमुख चेहरा भाजपमध्ये हवा, तुमच्या निवडणुकीसाठी 100 कोटी लागले, तरी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ, अशी ती ऑफर होती.

कोरेगाव : तीन वर्षांपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला भाजपमध्ये येण्याची ऑफर होती, असे सांगून आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, निवडणूकीसाठी शंभर कोटी लागले तरी खर्च करू. मंत्रीपद देऊन असेही सांगण्यात आले होते. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्यावरील निष्ठा अढळ असल्याने मी भाजपची ऑफर धुडकावली, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ल्हासुर्णे येथील निवासस्थानी त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशाचा लेखाजोखा सांगण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला. शशिकांत शिंदे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला भाजपमध्ये येण्याची ऑफर होती.

"पश्चिम महाराष्ट्रातील तुमच्यासारख्या प्रमुख चेहरा भाजपमध्ये हवा, तुमच्या निवडणुकीसाठी 100 कोटी लागले, तरी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ, अशी ती ऑफर होती; परंतु राष्ट्रवादीवरील आणि पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यावरील निष्ठा अढळ असल्याने मी भाजपची ऑफर धुडकावली होती.

" मदन भोसले, जयकुमार गोरे आदींसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेत्यांसोबत त्यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा शिरकाव झाला असला, तरी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व कायम आहे. त्यामध्ये कोरेगाव मतदारसंघातील 77 पैकी 54 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे वर्चस्व असून, सरपंचपदाच्या निवडीनंतर आणखी काही ग्रामपंचायती आमच्या ताब्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मी चळवळीत घडलेला कार्यकर्ता आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी कर्तव्य म्हणून पार पाडण्यासाठी मी शिकस्त करतच राहणार. कोणी कितीही टार्गेट केले, तरी आणि प्रसंगी कोणालाही अंगावर घेण्याची वेळ आली, तरी मी मागे हटणार नाही, अशा शब्दांत त्यांनी 'जिल्ह्याच्या राजकारणात शशिकांत शिंदे यांनाच टार्गेट का केले जाते?' या प्रश्नाचे उत्तर दिले.

दरम्यान, पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अंगापूर येथे, तर त्यानंतरच्या काही दिवसांतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवथर परीसरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमांच्या निमित्ताने शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख