सातारा : भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वेगळी योजना आखली असून २८ कार्यकर्ते विविध जिल्ह्यात जाऊन उमेदवारी अर्ज माघारीनंतर नेमकी काय परिस्थिती आहे, भाजपचे किती उमदेवार आहेत, किती गावे भाजपचा सरपंच होण्याच्या दृष्टीने जातील. याची माहिती घेतील. साडे चौदा हजार ग्रामपंचायतीत यश मिळविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकारी व कोअर कमिटीच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनामुळे भारतीय जनता पक्षात थोडी अनियमितता आली असली तरी प्रदेश पदाधिकारी, कोअर कमिटी, विविध मोर्चाच्या अध्यक्षांच्या बैठका नियमितपणे ऑनलाइन पध्दतीने होत होत्या.
मधल्या काळात प्रवास व प्रत्यक्ष भेटणे कमी झाले होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने पक्षाने संघटन बांधणीसाठी वेळ देण्याबाबत निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या सहा विधान परिषदेच्या निवडणुकांची समिक्षा झाली. यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आम्ही वेगळी योजना आणली आहे.
यामध्ये आमचे २८ कार्यकर्ते आगामी तीन दिवसांत आठ, नऊ, दहा जानेवारीला विविध जिल्ह्यांत जाऊन तेथे ग्रामपंचायत निवडणुकीत माघारीनंतर काय स्थिती आहे याची माहिती घेणार आहेत. यामध्ये ठिकाणी भाजपचे किती उमेदवार आहेत. त्यातील किती गावे सरपंच भाजपचा होण्याच्या दृष्टीने जातील, याची माहिती घेतील. त्यामुळे यावेळेस साडे चौदा हजार ग्रामपंचायतीत यश मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

