भाजपकडून होती विलासकाकांना 'ऑफर' - BJP had 'offer' to Vilasrao Undalkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपकडून होती विलासकाकांना 'ऑफर'

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपमधून लढावे, यासाठी गळ घालतानाच मंत्रीपदाचीही ऑफर दिली होती. मात्र, विलासकाकांनी ही ऑफर नाकारत मी राजकारण सोडेन पण जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही, असे सांगून त्यांनी अपक्ष निवडणुक लढवली. 

सातारा : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसने विलासराव पाटील उंडाळकरांऐवजी माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काका नाराज झाले होते. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी उंडाळकरांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपमधून लढण्यासाठी गळ घालतानाच मंत्रीपदाचीही ऑफर दिली होती. मात्र, विलासकाकांनी मी राजकारण सोडेन पण जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही, असे सांगून अपक्ष निवडणुक लढली व ते पराभूत झाले.

नोव्हेंबर २०१० पर्यंत पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रीय राज्यमंत्री होते. ११ नोव्हेंबरला त्यांनी महाराष्ट्राचे २२ वे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली. त्यानंतर त्यांना २८ एप्रिल २०११ मध्ये विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आले. २०१० ते २०१४ ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून त्यांना काँग्रेसने कऱ्हाड दक्षिणमधून निवडुन आणण्याचे ठरविले.

त्यासाठी मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार विलासकाका उंडाळकर यांना डावलून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उंडाळकर व त्यांचे समर्थक नाराज झाले. त्यांनी रयत संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहण्याचे ठरविले. सात पंचवार्षिक आमदार असूनही काँग्रेसने केवळ पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी विलासकाकांना उमेदवारी दिली नाही.

त्यावेळपासून पृथ्वीराज बाबा व विलासकाका यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांत ही दरी निर्माण झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सातारा जिल्ह्यात शिरकाव करायचा होता. त्यासाठी ते मतदारसंघ शोधत होते. काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या विलासकाकांना भाजपच्या नेत्यांनी त्यावेळी ऑफर दिली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपमधून लढावे, यासाठी गळ घालतानाच मंत्रीपदाचीही ऑफर दिली होती. मात्र, विलासकाकांनी ही ऑफर नाकारत मी राजकारण सोडेन पण जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही, असे सांगून त्यांनी अपक्ष निवडणुक लढवली. काकांचा नकार आल्याने भाजपने अतुल भोसले यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघातून निवडणुक लढविली.

यामध्ये विलासकाकांना ६० हजार ४१३ मते तर पृथ्वीराज चव्हाण यांना ७६ हजार ८३१ मते तर भाजपचे अतुल भोसले यांना ५८ हजार ६२१ मते मिळाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासकाकांसह भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांना पराभूत केले.  काँग्रेस पक्षाशी असलेली नाळ तुटून न देता काका पराभूत झाले पण त्यांनी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही.

त्यावेळपासून पृथ्वीराज चव्हाण (बाबा) व विलासकाका उंडाळकर यांच्या गटात वितुष्ट निर्माण झाले होते. तब्बल सहा वर्षानंतर काही दिवसांपूर्वी काका व बाबा गटात मनोमिलन झाले. पण त्यानंतर काका आजारी पडले आणि आज त्यांचे निधन झाले. शेवटच्या क्षणापर्यंत काका काँग्रेस पक्षांशी एकनिष्ट राहिले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख