सहानभुतीच्या लाटेतून भगीरथ भालकेंना जनतेने निवडून द्यायला हवे होते..... - Bhagirath Bhalke should have been elected by the people out of a wave of sympathy ..... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

सहानभुतीच्या लाटेतून भगीरथ भालकेंना जनतेने निवडून द्यायला हवे होते.....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

येथे पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. सगळ्या यंत्रणांचा कशा पध्दतीने वापर करायचा हे भाजपला चांगल्या प्रकारे माहिती आहे. भाजपने धनशक्तीच्या रणनीतीचा वापर केल्याने त्यांच्या उमेदवाराचा विजय झाला. पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा : पंढरपूर मतदारसंघात सहानभुतीच्या लाटेच्या माध्यमातून भगीरथ भालके यांना जनतेने निवडून देण्याबाबत निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात सर्व गट एकत्र आले. त्यामुळे आघाडीच्या मतांचे विभाजन झाले तर विरोधकांच्या मतांचे एकत्रीकरण झाले. तर भाजपने नेहमीप्रमाणे याही निवडणुकीत धनशक्तीचा वापर केल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद व आमदार शशीकांत शिंदे यांनी पंढरपूरच्या पराभवाची कारणमीमांसा केली आहे. 

आमदार शिंदे म्हणाले, या मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके हे एकदा कोरोना संकटातून बाहेर आले होते. ते अतिजोखमीमध्ये असूनही समाजासाठी अहोरात्र झटत होते. त्यातूनच त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली. यामध्ये त्यांचे दुर्दैवाने निधन झाले. या सहानभुतीच्या माध्यमातून भगीरथ भालके यांना येथील जनतेने निवडून देण्याबाबत निर्णय घ्यायला हवा होता. 

या मतदारसंघात पंढरपूर, मंगळवेढा हे दोन तालुके आहेत. पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक, सुधारक परिचारक यांचा एक गट तसेच विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा एक गट आहे. तर दुसरा भालकेंचा गट आहे. या निवडणुकीत हे सगळे गट एकत्र आले. त्यामुळे पंढरपूरमध्ये आघाडीवर राहण्याऐवजी महाविकास आघाडी पिछाडीवर राहिली.

हे सगळे गट भगीरथ भालकेंच्या विरोधता एकत्र आले होते. त्यातच मंगळवेढ्यातील स्थानिक उमेदवार असल्याने मत विभाजनाचा फटका महाविकास आघाडीला बसला. येथे संजय मामा शिंदेही चांगल्या प्रकारे काम करत होते. त्यामुळे आघाडीच्या मताचे विभाजन व दुसरीकडे भाजपच्या मतांचे एकत्रीकरण झाले. 

मागील निवडणुकीत श्री. औताडे अपक्ष उभे होते. त्यावेळी त्यांनी ४० ते ५० हजार मते घेतली होती. ते कशा पध्दतीने निवडणूक लढतात हे सर्वांना माहिती होते. येथे पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. सगळ्या यंत्रणांचा कशा पध्दतीने वापर करायचा हे भाजपला चांगल्या प्रकारे माहिती आहे. भाजपने धनशक्तीच्या रणनीतीचा वापर केल्याने त्यांच्या उमेदवाराचा विजय झाला. पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख