परराज्यातील खासगी बसचालकांना प्रवेशबंदी; आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य - Ban on entry to private bus drivers in near states; RT PCR test mandatory | Politics Marathi News - Sarkarnama

परराज्यातील खासगी बसचालकांना प्रवेशबंदी; आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

खासगी बस वाहतूकदारांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. राज्यासह, परराज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालक, वाहकांची आरटीपीसीआर चाचणीच केली जात नसल्याचे समोर येत आहे.

मुंबई : राज्यभरातील व परराज्यातून राज्यात येणाऱ्या खासगी बसचालकांना 'ब्रेक द चेन' मोहिमेंतर्गत कोव्हिड आरटीपीसीआर चाचणीचा
अहवाल सोबत ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे; मात्र राजस्थान, गुजरात, केरळ, गोवा, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांतील चालक हा अहवाल सोबत ठेवत नसल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे राज्याच्या सीमा तपासणी नाक्यावरच या चालकांना रोखून त्यांचा प्रवेश रोखण्यात येत आहे.

सरकारने 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत राज्यभरात कठोर निर्बंध लावले आहेत. खासगी प्रवासी वाहतुकीला मात्र काही अटींच्या आधारावर परवानगी देण्यात आली आहे; मात्र खासगी बस वाहतूकदारांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. राज्यासह, परराज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालक, वाहकांची आरटीपीसीआर चाचणीच केली जात नसल्याचे समोर येत आहे.

त्यामुळे स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने अशा खासगी बस वाहतूकदारांवर कारवाई केली जात आहे. राज्याच्या सीमा तपासणी नाक्यावर ही कारवाई करत अशा चालकांना राज्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यात येत आहे.

परराज्यातून मुंबईसह राज्यात येणाऱ्या खासगी बसचालकांकडे कोरोनाचे गेल्या १५ दिवसांतील निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. प्रमाणपत्र नसल्यास तशा वाहनांवर स्थानिक जिल्हा प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत आहे.

- अविनाश ढाकणे (परिवहन आयुक्त)

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख