साताऱ्यातील टोलनाक्‍यांचे ऑडिट करा : रणजितसिंह निंबाळकर  - Audit toll plazas in Satara says MP Ranjitsingh Nimbalkar | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्यातील टोलनाक्‍यांचे ऑडिट करा : रणजितसिंह निंबाळकर 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 5 मार्च 2021

पुण्याप्रमाणे साताऱ्यात टोलमध्ये सूट मिळणार का, या प्रश्‍नावर "एनएचआय'चे चिटणीस म्हणाले, ""पुण्यात टोलमाफीचा कोणताही आदेश नाही. ती तात्पुरत्या स्वरूपात तडजोड केलेली होती. मुळात स्थानिक नागरिकांना 20 किलोमीटरपर्यंतच्या परिघात मासिक पासची सुविधा आहे. त्यामुळे टोलमध्ये सूट मिळणार नाही.''

सातारा : खेड शिवापूर टोलनाक्‍यावरील बोगस पावत्यांचा पुणे पोलिसांनी पर्दाफास केला आहे. साताऱ्यातील आनेवाडी व तासवडे येथेही असा प्रकार झाला आहे का, याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी. त्यासाठी टोलनाक्‍यांचे ऑडिट करण्याची सूचना केल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी आज दिली.

दरम्यान, पुण्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातही स्थानिकांना टोलमध्ये सूट देण्याच्या मागणीवरून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हात झटकत केवळ मासिक पासचीच सोय असल्याचे सांगितले. 

"दिशा' समितीची बैठक आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी रणजितसिंह नाईक- निंबाळकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते.

या बैठकीनंतर दोन्ही खासदारांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रारंभी पाटील यांनी "दिशा' समितीचा उद्देश सांगितला. केंद्राच्या योजना तळगाळापर्यंत पोचविण्यासोबतच केंद्राशी समन्वय ठेवण्यासाठी ही समिती आहे. 2016 पासून या समितीची बैठक झालेली नव्हती. आता यापुढे सर्व आमदारांनाही या बैठकीत सहभागी करून घेऊन त्यांच्या सूचनाही लक्षात घेतल्या जातील. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा, समृद्ध ग्राम अभियान व फळबाग लागवड या योजनांवर अधिक भर दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पुण्याप्रमाणे साताऱ्यात टोलमध्ये सूट मिळणार का, या प्रश्‍नावर "एनएचआय'चे चिटणीस म्हणाले, ""पुण्यात टोलमाफीचा कोणताही आदेश नाही. ती तात्पुरत्या स्वरूपात तडजोड केलेली होती. मुळात स्थानिक नागरिकांना 20 किलोमीटरपर्यंतच्या परिघात मासिक पासची सुविधा आहे. त्यामुळे टोलमध्ये सूट मिळणार नाही.'' त्यावर रणजितसिंह म्हणाले, ""टोलनाक्‍यावर स्थानिकांना सूट मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आम्ही अधिवेशनात मुद्दा मांडू.

खेड शिवापूर टोलनाक्‍यावर जो बोगस पावत्यांचा प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील टोलनाक्‍यावर असा प्रकार झाला आहे का, याची चौकशी करावी. या ऑडिटमध्ये सर्व काही बाहेर येईल.'' जिल्हाधिकारी शेखर सिंह व खासदार श्रीनिवास पाटील यांनी मात्र, या प्रश्‍नावर मत व्यक्त करणे टाळले. महापुरुषांचे पुतळे विकासकामांत अडथळे ठरत असतील तर प्रशासन कोणती भूमिका घेणार, या प्रश्‍नावर खासदार रणजितसिंह निंबाळकर व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लोकभावनांचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख