फडणवीस फ्रस्ट्रेड आहेत की नाहीत? प्रवीण दरेकरांनी दिले हे उत्तर...

मुळात फ्रस्ट्रेशन महाविकास आघाडी सरकाला आलेले आहे. मुंबईच्या महापौर व सत्ताधारी मंडळींना आले आहे. एका बाजूला कोणत्या विषयाचे कौतूक झाले, की आम्ही लगेच अभिनंदनाचे ढोल पिटताना ९० टक्के गोष्टीत सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. या सगळ्या गोष्टीने भांबावलेल्यांच्या चेहऱ्यावर फ्रस्ट्रेशन दिसत आहे.
फडणवीस फ्रस्ट्रेड आहेत की नाहीत? प्रवीण दरेकरांनी दिले हे उत्तर...
Are Fadnavis frustrated or not? This answer given by Praveen Darekar ...

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविसांना Devendra Fadanvis फ्रस्ट्रेशन आल्याचा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर Kishori Pendnekar यांनी केल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी त्यास उत्तर दिले असून हे फडणवीस यांचा चेहरा बघा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बघा, फ्रस्ट्रेड कोण आहे, हे तुम्हाला दिसेल, असा टोला त्यांनी लगावला

देवेंद्र फडणविसांना फ्रस्ट्रेशन आलय, असे वक्तव्य मुंबईच्या महापौरांनी केले होते, याचा समाचार घेताना भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले,  फ्रस्ट्रेशन कोणाला का व कशासाठी येईल, हा महत्वाचा प्रश्न आहे. देवेंद्रजी पाच वर्षे सक्षम आणि यशस्वी मुख्यमंत्री राहिले आहेत. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची कामगिरी अप्रतिम राहिली असून सरकारला धारेवर धरणे व दिशा दाखविण्याचेही काम त्यांनी केलेले आहे.

केंद्राशी समन्वय साधत राज्याला मदत आणण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात त्यांना व त्यांच्या पक्षाला जनाधार आहे. त्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन येण्याचे कारण काय, मुळात फ्रस्ट्रेशन महाविकासआघाडी सरकाला आलेले आहे. मुंबईच्या महापौर व सत्ताधारी मंडळींना आले आहे. एका बाजूला कोणत्या विषयाचे कौतूक  झाले, की आम्ही लगेच अभिनंदनाचे ढोल पिटताना ९० टक्के गोष्टीत सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. या सगळ्या गोष्टीने भांबावलेल्यांच्या चेहऱ्यावर  फ्रस्ट्रेशन दिसत आहे.

फ्रस्ट्रेशन महाविकास आघाडीच्या सदस्यांना आहे. फडणवीस यांचा चेहरा बघा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बघा, फ्रस्ट्रेड कोण आहे, हे तुम्हाला दिसेल, असा टोला त्यांनी लगावला. राज्य सरकारने नुकतेच एक अनलॉकचे परिपत्रक काढले आहे. त्यावर टीका करताना प्रवीण दरेकर म्हणाले, हे ढोबळ पध्दतीने काढलेले पत्रक आहे.


पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजनचे बेड उपलब्धता यांचे व नियमावलीत कुठलेही साधर्म साधले जात नाही. जिल्हाधिकारी व आयुक्त तेथील परिस्थिती व गरजेनुसार नियमावलीत बदल करतील. दुसऱ्या टप्प्यात मुंबई, मुंबई महानगरपालिकेतील क्षेत्रे, अमरावती वगैरे असतील यामध्ये पूर्णपणे विसंगत अशी नियमावली आहे. 

लॉकडाऊन शिथिल करताना सगळ्यांना मुभा दिली जात असताना मंदीराचा समावेश का नाही, याविषयी विचारले असता श्री. दरेकर म्हणाले, मंदीरांच्या बाबत पहिल्यापासून या सरकारची भूमिका विरोधाची राहिली आहे. अगदी राममंदीरापासून सत्तेत असतानाची वक्तव्ये आणि नंतर महाविकास आघाडीत असताना शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका बदलली आहे. मंदीरे उघडण्याबाबत त्यांचे मनोधैर्य का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करून श्री. दरेकर म्हणाले, आज ही वारकरी दिंडी व पालखीसाठी आक्रमक आहेत.

त्याबाबतचे कुठल्याही प्रकारचे प्रयोजन त्यांच्या अनलॉकमध्ये दिसत नाही. मंदीर, हिंदूत्व, धर्म आणि वारकरी यांच्याबाबत त्यांची अनास्था दिसून येत आहे. यासंदर्भात भाजप आवाज उठवणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, भाजप निश्चितपणे यासंदर्भात बोलेल. पण, झोपलेल्यांना उठविता येते. यासंदर्भात आम्ही अनेक आंदोलने केली, अनेक पत्रे, निवेदने दिली. वारकरी संघटना, मंदीर ट्रस्ट, पुजारी यांनी निवेदन दिली आहेत. पण या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, त्यांना किती हलवले तरी ते जागे होताना दिसत नाहीत, अशी टीकाही श्री. दरेकर यांनी केली.  

मंदीरे उघडल्याने मागील वेळी कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे सांगितले जात आहे. यावर श्री. दरेकर म्हणाले, स्वतःच्या पक्षांचे मेळावे, स्वतःच्या मंत्र्यांनी केलेली गर्दी, पंढरपूरच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पाच हजारांचा मेळावा, यासंदर्भात नियमावली आडवी येत नाही. आमचे श्रध्दांस्थान असलेली मंदीरे, वारकरी संप्रदायाच्या मागण्यापुढे आल्या की नियमावली दिसते. वारकऱ्यांच्या प्रमुखांनी नियमावली पाळत पंढरपूरला जाऊ शकतो, असे सांगूनही त्यावर कोणताही संवाद सरकारने साधलेला नाही. त्यातून त्यांची भावना दिसून येते. 

मुंबईत लस मिळत नाही, यावर श्री. दरेकर म्हणाले, सरकारचे लसीकरणाचे मुंबई मॉडेल पूर्णपणे फेल गेले आहे. लसीकरणाबाबत तकलादू वक्तव्ये महापौर व सरकारने केलेली आहेत. केवळ मुंबईकरांपुढे दिखावूपणा केला आहे. लसी खरेदी करण्याचा अधिकार राज्यांना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दीड महिन्यांपूर्वी सांगितले होते. राज्यांना अधिकार दिलेला असताना त्यांनी प्रयोजन करायला हवे होते. ग्लोबल टेंडरची राणा भीमदेवी थाटात घोषणा केली. मुळात टेंडर उशीरा व सदोष काढले.

सुरवातीला राज्य सरकारची परवानगी असल्याचे सांगितले. नंतर केंद्राची परवानगी लागते, असे सांगतात. ते जाणून बुजून चुका करत दीड दोन महिने वेळ काढला. या टेंडरला नऊ कंपन्या आल्या, ज्यांच्या मध्ये प्रोडक्टव्हिटीच नाही. स्वतःच्या कौतूकाची पाठीवर थाप मारत बसलेल्या मुंबई महानगरपालिकेला मला विचारायचे आहे की, ग्लोबल टेंडर काढल्यानंतर एकही कंपनी आलेली नाही, इतकी महापालिकेची विश्वासार्हता संपली आहे का, त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे का, याचे उत्तर महापालिकेला द्यावे लागेल. कोणती कंपनीच येऊ नये म्हणून काही अटी घातल्या आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला.  

महापौरांच्या वक्तव्याचा समाचार घेताना श्री. दरेकर म्हणाले, सरकार व महापौरांची वक्तव्ये जबाबदारीची वाटत नाहीत, विषयांचे गांभीर्य कोणत्याच वक्तव्यात दिसत नाही. विरोधीपक्ष महाराष्ट्रात काम करतोय, लोकांत मिळसतोय, पण यांना किती गांभीर्य आहे. सेवा भाववी वृत्तीने देवेंद्रजींनी केलेल्या सूचना त्यांना बोचणाऱ्या आणि नियोजन कसे चुकीचे झाले आहे हे सांगणाऱ्या वाटत आहेत. विरोधी पक्ष असल्यासारखे सत्ताधारी बोलत आहेत.

तर सरकार कधी कोसळेल हे ही कळणार नाही...

सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब कोसळला याविषयी विचारले असता श्री. दरेकर म्हणाले, प्रमुख बैठकांचे ठिकाण असलेल्या सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॉब पडतानासरकारला कळत नाही. तर आमचे सरकार पडणार नाही म्हणणाऱ्यांना हे संकेत आहे. या घटनेतून आदित्य ठाकरे सुध्दा बचावले आहेत. स्लॅब कोसळताना कळला नाही, तर सरकार कधी कोसळेल हे ही त्यांना कळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in