माथाडी कामगारांनाही पॅकेज जाहीर करा : नरेंद्र पाटलांची मुख्यमंत्र्यांना विनंती - Announce package to Mathadi workers in Corona: Narendra Patil's request to CM | Politics Marathi News - Sarkarnama

माथाडी कामगारांनाही पॅकेज जाहीर करा : नरेंद्र पाटलांची मुख्यमंत्र्यांना विनंती

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी माथाडी कामगारांवर एवढं नाराज होण्याची आवश्यकता नाही. हा सुद्धा एक कष्टकरी घटक आहे. कारखान्यातील कामगारांचा जसा आपण विचार करत आहात तसाच माथाडी कामगारांबाबतही योग्य निर्णय घेवून कार्यवाही करावी'.

ढेबेवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 'ब्रेक द चेन' ची नियमावली जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी मदतीची घोषणा केली आहे. मात्र, कष्टकरी माथाडी कामगारांबाबत त्यांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. लॉकडाउनच्या काळात गेल्यावर्षी आणि आत्तासुद्धा जीव धोक्यात घालून राबणाऱ्या या घटकांबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेवून त्यांनाही पॅकेज जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी मदतीची घोषणा केलेली असली तरी कष्टकरी माथाडी कामगारांबाबत मात्र कोणताही निर्णय न घेतल्याने या कष्टकऱ्यात संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील म्हणाले, 'गेल्यावर्षी प्रथम लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर राज्यातील विविध बाजार समित्यांकडे काम करणाऱ्या माथाडी कामगारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तूंची चढ-उतार व वाहतूक केली. 

शासनाच्या आदेशानुसार जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यात महत्वाचे योगदान दिले, यामध्ये अनेक कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाला. सुमारे 25 माथाडी कामगारांचा कोरोनाने बळी घेतला. अजूनही त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत शासनाचा काही निर्णय झालेला नाही. आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ब्रेक द चेन" ची घोषणा केली आहे.

यामध्ये अनेक घटकांना त्यांनी दिलासा देणारी भूमिका जाहीर केलेली असली तरी माथाडी कामगारांबाबत मात्र निर्णय घेतलेला नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी माथाडी कामगारांवर एवढं नाराज होण्याची आवश्यकता नाही. हा सुद्धा एक कष्टकरी घटक आहे. कारखान्यातील कामगारांचा जसा आपण विचार करत आहात तसाच माथाडी कामगारांबाबतही योग्य निर्णय घेवून कार्यवाही करावी'.

''गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात जीवनावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी जीवाची पर्वा न करता कष्टकरी माथाडी कामगार कार्यरत राहिला होता, सुमारे 25 माथाडी कामगारांचा कोरोनाने बळी घेतला. सध्याही असुरक्षितता असतानाही तो राबतोच आहे. शासनाने त्यांना दिलासा द्यायलाच हवा''.

- नरेंद्र पाटील (माथाडी कामगार नेते)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख