सर्वपक्षीय मातब्बरांना धूळ चारत जयकुमार गोरेंनी मारली होती बाजी! - All the opponents came together but Jayakumar Gore won | Politics Marathi News - Sarkarnama

सर्वपक्षीय मातब्बरांना धूळ चारत जयकुमार गोरेंनी मारली होती बाजी!

विशाल गुंजवटे 
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून जयकुमार गोरेंनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांना प्रभाकर देशमुख तुल्यबळ लढत देत होते. माण तालुक्यातील १५ फेऱ्यांमध्ये जयकुमार गोरेंनी १३ हजार ६३७ मतांची आघाडी घेतली होती.

बिजवडी (ता. माण) : २४ ऑक्टोंबर २०१९ ला आज वर्ष पूर्ण झाले. याचदिवशी आमदार जयकुमार गोरे यांनी माण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत हॅटट्रीक केली होती. मतदारसंघातील सर्वपक्षीय मातब्बर नेतेमंडळींना त्यांनी एकहाती पराभवाची धूळ चारत जेसीबीने गुलाल उधळत, फटाक्यांच्या आतषबाजीत विजयोत्सव साजरा केला होता. आज या विजयोत्सवाला वर्ष पूर्ण होत असून आजही जय हो.....च्या विजयाच्या गुलालाची व त्यांच्या ॲक्शनची आठवण माण- खटाव वासियांना मनाला सुखावत आहे.

२०१९ च्या माण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत विद्दमान आमदार जयकुमार गोरे यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली होती. मतमोजणीचा दिवस उजाडला. मतमोजणीच्या फेऱ्यांचे निकाल हाती येऊ लागले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून जयकुमार गोरेंनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांना प्रभाकर देशमुख तुल्यबळ लढत देत होते. माण तालुक्यातील १५ फेऱ्यांमध्ये जयकुमार गोरेंनी १३ हजार ६३७ मतांची आघाडी घेतली होती.

ही आघाडी खटाव तालुक्यातील वीस फेऱ्यानंतर प्रभाकर देशमुखांना कमी करण्यात यश आले. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या लढतीत जयकुमार गोरेंनी ३ हजार ४३ मतांनी बाजी मारली. माणच्या फेऱ्यात आमदार जयकुमार गोरेंना मिळालेली आघाडीच त्यांना विजयी करून गेली. जयकुमार गोरे यांना ९१ हजार ४६९ , प्रभाकर देशमुख यांना ८८ हजार ४२६ तर शेखर गोरे यांना ३७ हजार ५३९ मते मिळाली. आमदार जयकुमार गोरेंनी हँट्रीक साधत विजय खेचून आणला. 

नाराजांची पक्षविरहित आघाडी...
माण, खटावमधील सर्वपक्षिय नेतेमंडळींनी आमचं ठरलंय...म्हणत पक्षविरहित आघाडी करत निवडणूक लढवली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, डॉ.संदीप पोळ, सुरेंद्र गुदगे, काँग्रेसचे एम. के. भोसले, तसेच मूळचे भाजपाचे पण आमदार गोरेंवर नाराज असलेले डॉ. दिलीप येळगांवकर, अनिल देसाई, शिवसेनेचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्यासह माण - खटावचे काँग्रेस, राष्ट्रवादी, तसेच भाजपाची नाराज नेतेमंडळी या सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. पक्षविरहित सर्वजण एकत्र आल्याने उमेदवारी कोणी करायची यावरून महाभारतही घडले. पण यात बाजी मारली ती माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी. सर्वानुमते त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. 

युतीचे दोन उमेदवार...
तिरंगी लढतीत शिवसेनेकडून शेखर गोरे रिंगणात उतरले होते. या निवडणूकीत भाजपा - शिवसेनेची युती असूनही एकाच मतदारसंघात दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार दिले. त्यामुळे दोन्ही गोरे बंधूना आपल़्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्या. त्यामुळे माणच्या निवडणूकीत आणखीनच रंगत आली होती. प्रचारादरम्यान, आरोप -प्रत्यारोप, विविध आश्वासने देत प्रचार यंत्रणेत सर्वांनीच आघाडी घेतली होती. राजकीय तज्ञ व कार्यकर्त्यांत कोण निवडून येईल याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. 
 जेसीबीने गुलाल उधळला...
विजयी होताच आमदार जयकुमार गोरेंची दहिवडीत जेसीबीने गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. आपल्या व्हीआयपी गाडीच्या टपावर उभे राहून गुलालात न्हालेल्या आमदारांनी दंड थोपटून विरोधकांना माणच्या राजकारणातला पैलवान कोण आहे, ते शड्डू ठोकून दाखवून दिले. गाडीच्या टपावरच पैलवानकीच्या कसरती करत आनंद साजरा केला. बंदूकीतून गोळ्या कशा झाडल्या जातात तशी ॲक्शन, पैलवानकीच्या कसरती या विविध ॲक्शनवर जनता फिदा होऊन अक्षरश: नाचत होती. यादिवशी दहिवडीतील सर्व रस्ते गुलालमय झाले होते. आमदार जयकुमार गोरेंच्या विजयोत्सवाला आज वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त कार्यकर्ते विजयोत्सवाच्या जल्लोषाच्या आठवणीत निश्चितच रमले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख