शिवेंद्रसिंहराजेंनी मागितले अन्‌ अजित पवारांनी सातारच्या मेडिकल कॉलेजला दिले ६१ कोटी - Ajit Pawar has provided Rs 61 crore for Satara Medical College | Politics Marathi News - Sarkarnama

शिवेंद्रसिंहराजेंनी मागितले अन्‌ अजित पवारांनी सातारच्या मेडिकल कॉलेजला दिले ६१ कोटी

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

मेडिकल कॉलेजसाठी वैद्यकीय शिक्षणमधून 61 कोटींची तरतूद श्री. पवार यांच्या सुचनेनुसार करण्यात आली आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेज नाशिक विद्यापीठाला संलग्न करण्याचा निर्णयही झाला असून आता नॅशनल मेडिकल कमिशन मार्फत येत्या 15 दिवसांत प्रत्यक्ष पाहणी होऊन पुढील कार्यवाही सुरु होणार आहे. 

सातारा : अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जिल्ह्याचा मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. या मागणीवरून झालेल्या बैठकीत वाढीव 60 एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 61 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

त्यामुळे मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावण्यात शिवेंद्रसिंहराजेंना यश आले आहे. त्यांनी अजित पवार, पालकमंत्री पाटील यांचे जिल्हा वासियांच्यावतीने आभार मानले आहेत. विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनादरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

यावेळी विविध विकासकामांसोबतच मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण होण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर श्री. पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कृष्णानगर येथील कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जागा अधिगृहीत केली होती. उर्वरीत 60 एकर जागा हस्तांतरीत करण्यात यावी. त्यासाठीच्या प्रशासकीय बाबी पूर्ण कराव्यात आणि मेडिकल कॉलेज उभारणीस प्रारंभ होण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

 यानंतर श्री. पवार यांनी तातडीने वाढीव 60 एकर जागा मेडिकल कॉलेजसाठी हस्तांतरीत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. मेडिकल कॉलेजसाठी वैद्यकीय शिक्षणमधून 61 कोटींची तरतूद श्री. पवार यांच्या सुचनेनुसार करण्यात आली आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेज नाशिक विद्यापीठाला संलग्न करण्याचा निर्णयही झाला असून आता नॅशनल मेडिकल कमिशन मार्फत येत्या 15 दिवसांत प्रत्यक्ष पाहणी होऊन पुढील कार्यवाही सुरु होणार आहे. 

कासच्या कामांसाठी 57.29 कोटी मंजूर 
कास धरण उंची वाढविण्यासाठी आवश्‍यक 57. 29 कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला. यामुळे धरणाच्या कामातील अडथळा दुर झाला असून याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी अजित पवार यांचे आभार मानले. निधीअभावी कास धरणाचे काम रखडले होते. हे काम पूर्ण होण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी श्री. पवार यांच्याकडे केली होती. यानुसार श्री. पवार यांनी अधिवेशनात या प्रकल्पाच्या कामासाठी वाढीव 57 कोटी 29 लाखांची निधीची तरतूद केली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख