साताऱ्यातील कोरोना रोखण्यासाठी अजित पवार, टोपेंनी लक्ष घालावे : शिवेंद्रसिंहराजे

लॉकडाउन सुरु असतानाही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही, याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी चूक होत आहे, हे निश्चित. जिल्ह्यात हीच परिस्थिती राहिल्यास मोठा अनर्थ ओढवेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावे.
साताऱ्यातील कोरोना रोखण्यासाठी अजित पवार, टोपेंनी लक्ष घालावे : शिवेंद्रसिंहराजे
Ajit Pawar and Tope should pay attention to prevent corona in Satara says MLA Shivendraraje

सातारा : कोरोना महामारीने (Corona Pandamic) सातारा जिल्ह्याला विळखा घातला असून हा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. राज्यातील इतर मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा सारख्या छोट्या जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजारांवर रुग्णवाढ होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून साताऱ्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लक्ष घालावे. त्यांनी साताऱ्यात येऊन आढावा घ्यावा आणि हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, असे आवाहन भाजपचे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी केले आहे. Ajit Pawar and Tope should pay attention to prevent corona in Satara says MLA Shivendraraje

गेले महिनाभर सातारा जिल्ह्यात लॉकडाउन सुरु आहे. आता आज मध्यरात्रीपासून पुन्हा जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन असतानाही गेल्या महिनाभरात रुग्ण संख्या आटोक्यात आलेली नाही. मग आता या पाच दिवसांच्या लॉकडाउनमध्ये येईल, असे वाटत नाही, असे सांगून आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कालच्या आकडेवारीनुसार मुंबईत १४२३, पुणे जिल्ह्यात ९००, सोलापूरमध्ये १५३६, सांगलीमध्ये ११२६  तर कोल्हापूर जिल्ह्यात १७७४ च्या आसपास बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

सातारा जिल्ह्यात तब्ब्ल २६४८ रुग्ण वाढले. गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन ते अडीच हजारांवर रुग्णवाढ होत असून ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. लॉकडाउन सुरु असतानाही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही, याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी चूक होत आहे, हे निश्चित. जिल्ह्यात हीच परिस्थिती राहिल्यास मोठा अनर्थ ओढवेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावे.

त्यांनी तातडीने साताऱ्यात यावे आणि जिल्ह्यातील कोरोना महामारीचा आढावा घ्यावा. तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि त्यांच्यामार्फत कोरोनाला आळा घालण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे आणि नियोजनबद्धरीत्या जिल्ह्यातील परिस्थिती हाताळावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. 

महिनाभर लॉकडाउन असूनही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. लॉकडाउनमुळे सर्वसामान्य लोक तसेच हातावर पोट असणाऱ्या, रोजंदारी करणाऱ्या गोर- गरीब लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. असंख्य लोकांची उपासमार सुरु आहे. लॉकडाउन असाच सुरु राहिल्यास लोकांना उदरनिर्वाह करणे आणि जगणे मुश्किल होणार आहे, याचीही अजित पवार, मंत्री टोपे आणि प्रशासनाने गंभीर दाखल घ्यावी.

तसेच रॅपिड ऍक्शन टेस्टमध्ये वाढ करावी. ग्रामीण भागात सर्वत्र 'रॅट टेस्ट' किट उपलब्ध करून द्यावीत. बाधित आहेत पण कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा लोकांचा शोध घ्यावा, जेणेकरून कोरोनाची साखळी तोडणे सोपे जाईल. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साताऱ्यात यावे. परिस्थितीचा आढावा घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात आणि जिल्ह्यातील हाताबाहेर गेलेली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणावी.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in