विलासकाका, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनोमिलनाची गाडी दुसऱ्या स्टेशनवर - Adv. Udaysingh Patil will be activated in the state level committee of the Congress. | Politics Marathi News - Sarkarnama

विलासकाका, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनोमिलनाची गाडी दुसऱ्या स्टेशनवर

हेमंत पवार
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

दोन्ही गट एकत्र आल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो, हे मलकापूर पालिकेच्या निवडणुकीतून दिसून आले. त्यामुळे श्री. चव्हाण गट तेव्हापासून उंडाळकर गटाची फारकत घेताना दिसून आला नाही.

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यातील दरी कमी झाली आहे. त्यामुळे मध्यंतरी श्री. चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते विलासराव उंडाळकर यांची त्यांच्या साताऱ्यातील ''राजविलास'' या बंगल्यात जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे टोकाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला होता. आता पुढचे पाऊल म्हणुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि उंडाळकरांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील यांची मुंबईत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये ॲड. पाटील यांना काँग्रेसच्या राज्यस्तरीय समितीत सक्रीय करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे काका गट पुन्हा एकदा काँग्रेससोबत येऊन जिल्ह्यात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाने आत्तापर्यंत विधानसभेचे तीनच आमदार पाहिले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. पहिल्यांदा जेष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर तब्बल सात टर्म म्हणजेच 35 वर्षे सलग माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे या मतदारसंघाचे आमदार राहिले.

त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुक लढवली. त्यामध्ये श्री. चव्हाण विजयी होऊन ते कऱ्हाड दक्षिणचे आमदार झाले. राजकीय संघर्षातुन पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव उंडाळकर गटात नेहमीच मोठी चुरस पहायला मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आई-वडील खासदार होते. त्यानंतर ते स्वतः खासदार झाले. त्या काळातील राजकीय संघर्षातुन विलासराव पाटील-उंडाळकर हे बाजुला होऊन त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला.

त्या माध्यमातुन त्यांनी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणुन नेतृत्व करत असतानाच त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबीनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. तर पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणुन काम पहात होते. त्यामुळे ते दिल्लीत आणि उंडाळकर राज्यात आपला बकुब राखुन होते. मात्र, दोन्ही गटातील संघर्ष कमी करण्यासाठी कोणीच प्रयत्न केला नाही.

त्याचा नाही म्हटला तरी काँग्रेस पक्षाला फटका बसला. त्यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह अन्य निवडणुकांत काँग्रेस पक्षाकडुन उमेदवारी मिळवताना मोठ्या अडचणी यायच्या. त्यावेळी उंडाळकर गटाला अपक्ष
उमेदवार उभे करुन निवडुन आणावे लागत होते. त्याचबरोबर मध्यंतरी अॅड. उदयसिंह पाटील यांच्यावर आलेल्या एका संकटावेळीही दोन्ही गटातील संबंध बरेच ताणले गेले होते.

त्यानंतर पुलाखालुन बरे पाणी वाहिले. त्यानंतरच्या काळात बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व नेते उंडाळकरांच्या विरोधात एकत्र आले. त्यावेळीही दोन्ही गटातील संबंधित टोकाला गेले होते. त्यानंतर उंडाळकर गटाने भोसले गटाच्या मदतीने बाजार समितीतील सत्ता परत मिळवली तर भोसले गटाला कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत मदत केली. त्यानंतर मात्र टप्याटप्याने या दोन्ही गटातील दरी कमी होण्यास सुरुवात झाली.

उंडाळकरांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि मनोहर शिंदे यांनी पुढाकार घेऊन दोन्ही गटातील दरीवर पडदा टाकण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा पहिला प्रयोग मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत करण्यात आला. तेथे पहिल्यादांच या निवडणुकीत हे दोन गट एकत्र आले. चव्हाण गटाचे मनोहर शिंदे यांना उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी साथ दिली. त्यामुळे शिंदे यांचा मलकापुर पालिकेतील विजय सुकर झाला.

मलकापूरचा पॅटर्न काँग्रेसच्या उभारणीसाठी कऱ्हाड दक्षिणमध्ये राबवण्याची कार्यवाही तेव्हापासून सुरू झाली. दोन्ही गट एकत्र आल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो, हे मलकापूर पालिकेच्या निवडणुकीतून दिसून आले. त्यामुळे श्री. चव्हाण गट तेव्हापासून उंडाळकर गटाची फारकत घेताना दिसून आला नाही. त्यानंतर मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाण व गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उंडाळकर यांची त्यांच्या साताऱ्यातील ''राजविलास'' या बंगल्यात जाऊन भेट घेतली.

माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी पहिल्यांदाच उंडाळकर यांची घरी जाऊन भेट घेतल्याने या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. त्यानंतर नुकतीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री थोरात, आमदार चव्हाण आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये ॲड. पाटील यांना काँग्रेसच्या राज्यस्तरीय समितीत सक्रीय करण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे.

 

''काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण व माझी मुंबईत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये काही चर्चा झाल्या. मी कोणतीही मागणी केलेली नाही.मात्र, काँग्रेस पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी तयार दर्शवली आहे. ''

-  ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख