सातारा : केवळ सरपंच पद स्वीकारल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, या अंधश्रध्देपोटी महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावातील सरपंचपद गेल्या चार पंचवार्षिक रिक्त राहिले होते. सरपंच व्हायचे धाडस कोणीही दाखवत नव्हते. पण एका महिलेने अंधश्रध्दा झुगारून सरपंच होण्याचे धाडस दाखविले. नुकत्याच झालेल्या निवडीत राजपुरीच्या सरपंचपदी शीतल विश्वास राजपुरे यांची निवड झाली आहे. नव्या पिढीतील युवकांच्या पुढाकाराने गावास तब्बल चार पंचवार्षिकनंतर यंदा सरपंच मिळाला आहे. तर उपसरपंचपदी शंकर आनंदा राजपुरे यांची निवड झाली आहे.
सरपंच पदासाठी गावागावात जोरदार रस्सीखेच सुरू असते. काही ठिकाणी तर सख्ये भाऊ या पदासाठी आपली भाऊबंदकी विसरून एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. परंतु सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावची गोष्टच वेगळी आहे. या गावचा सरपंच होण्यास गेली चार टर्म सरपंच व्हायला कोणी धाडस दाखवत नव्हते. याला कारण ही तसेच आहे. सरपंचपद स्वीकारलं की त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, अशी अंधश्रध्दा या गावात पसरली होती.
चार पंचावार्षिक पूर्वी राजपुरी गावाच्या सरपंचाचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि त्यानंतर चार वर्ष या गावात कोणीच सरपंच झालं नाही. यावर्षी ही सरपंच पद रिक्त राहणार असेच चित्र होते. मात्र एका महिलेच्या धाडसामुळे या गावाला सरपंच मिळाला आहे. याचे सर्व श्रेय गावातल्या तरुण वर्गाला जाते. शीतल विश्वास राजपुरे असे या सरपंच महिलेचे नाव आहे. शीतल यांनी धाडसाने पुढे येत गावचे नेतृत्व करणास आपण तयार असल्याचे येथील नेते राजेंद्र राजापुरे यांच्याशी संपर्क साधला.
त्यावर राजेंद्र राजापुरे यांनी त्यांना तात्काळ होकार दिला. त्यानंतर त्यांची ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवड झाली. योगायोगाने सरपंच पदाचे आरक्षणही महिलेसाठी पडले. गावात एकच जल्लोष सुरू झाला आणि शीतल राजपुरे यांना सरपंच पद देण्यात आले. अंधश्रध्दा झुगारन या महिलेने दाखवलेल्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. गावात सरपंच पदाबाबत असलेल्या अंधश्रद्धेची माहिती असुन ही शीतल राजपुरे यांनी दाखवलेले धाडस हे पाहून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी स्वतः या गावास भेट देऊन अंनिसकडून या महिलेचे कौतुक करून सत्कार केला.

