महामार्गावरील ब्लॅक स्पॉट, उड्डाणपुलांच्या दुरूस्तीसाठी ५५८.२४ कोटी; श्रीनिवास पाटलांचा पाठपुरावा - 558.24 crore for repair of flyovers, black spots on highways; The pursuit of MP Srinivas Patil | Politics Marathi News - Sarkarnama

महामार्गावरील ब्लॅक स्पॉट, उड्डाणपुलांच्या दुरूस्तीसाठी ५५८.२४ कोटी; श्रीनिवास पाटलांचा पाठपुरावा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

खासदार पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन मंत्री गडकरी  यांनी 22 सप्टेंबर 2020 रोजी खासदार पाटील यांना पत्र लिहीले. त्यात दुरुस्‍ती व सुधारणांची काम हाती घेत असल्याचे कळविले होते. त्यानंतर लोकसभेच्या अर्थसकंल्पीय अधिवेशनात प्रश्‍नोत्‍तराच्‍या काळात खासदार पाटील यांनी मुद्दा लावून धरला. खासदार पाटील यांनी केलेल्या मागण्या व सूचनांना मंत्री गडकरी यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला. त्यामुळे भरघोस निधी मंजूर झाला आहे. 

कऱ्हाड : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांच्या सुधारणा, दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 558 कोटी 24 लाखांचा निधी मंजूर केला आहे. यातील 459 कोटी 52 लाखांचा निधी मलकापूर येथील नव्या उड्डाण पूलासाठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे उड्डाणपूलासह महामार्गच्या दुरूस्तीलाही गती येणार असून महामार्गावरील प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.

कागल ते शेंद्रे महामार्गाच्‍या पटृयातील पाच धोकादायक 'ब्‍लॅक स्‍पॉट'च्या दुरुस्‍ती व सुधारणांसाठी तब्‍बल 646 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील चार ठिकाणे सातारा जिल्‍हयातील आहेत. मलकापूर येथील नव्‍या उड्डाणपूलासाठी 459 कोटी 52 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

मसूर फाटा येथे 47 कोटी 18 लाख, इंदोली फाटा येथे 45 कोटी 35 लाख रूपये भुयारी पुलासाठी मंजूर आहेत. काशीळ फाटा येथे महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूस दीड किलोमीटरच्या सेवा रस्त्यासाठी सहा कोटी 19 लाखांची तरतूद आहे. या सगळ्या कामांची अंमलबजावणी सातारा ते कागल महामार्गाच्‍या सहापदरीकरणाच्या कामाबरोबर केली जाणार आहे. खासदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे.

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीनंतर खासदार पाटील यांनी नोव्‍हेंबर 2019 मध्ये केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्‍यवहार केला. त्यांना प्रत्‍यक्ष भेटून जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मागण्या त्यांनी केल्या. सातारा ते कागल अशा 132 किलोमीटरच्या मार्गाची झालेली दुर्दशा, तेथे वहातूकीला निर्माण होणारी अडचण त्यांनी सांगितली. त्यासह पटृयातील अपघातांची माहिती देत त्याकडे मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले. 

खासदार पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन मंत्री गडकरी  यांनी 22 सप्टेंबर 2020 रोजी खासदार पाटील यांना पत्र लिहीले. त्यात दुरुस्‍ती व सुधारणांची काम हाती घेत असल्याचे कळविले होते. त्यानंतर लोकसभेच्या अर्थसकंल्पीय अधिवेशनात प्रश्‍नोत्‍तराच्‍या काळात खासदार पाटील यांनी मुद्दा लावून धरला. खासदार पाटील यांनी केलेल्या मागण्या व सूचनांना मंत्री गडकरी यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला. त्यामुळे भरघोस निधी मंजूर झाला आहे. 

जिल्‍हयातील राष्‍ट्रीय, राज्‍य महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करुन त्‍याबाबत केंद्रीय रस्‍ते वहातूक मंत्रालयाला कळवण्यात यावे, त्यावरही तातडीने निर्णय घेण्यात येथील असे ठोस आश्‍वासन मंत्री गडकरी यांनी खासदार पाटील यांना लोकसभेत दिले होते. त्यानुसार जिल्‍हाधिकारी, पोलिस अधीक्षक व आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक घेवून जिल्ह्यातील अपघात प्रवणक्षेत्र निश्चित करण्‍याचे काम हाती घेणार आहे.

-श्रीनिवास पाटील (खासदार, सातारा लोकसभा) 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख