पवारांच्या लाडक्या जिल्ह्यात राष्ट्रवादीची अवस्था बिकट - 22nd Anniversary of NCP | Politics Marathi News - Sarkarnama

पवारांच्या लाडक्या जिल्ह्यात राष्ट्रवादीची अवस्था बिकट

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 जून 2021

सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. यामध्ये फलटणचे दीपक चव्हाण, वाईचे मकरंद पाटील आणि कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील या तिघांचा समावेश आहे. यापैकी बाळासाहेब पाटील यांना सहकार व पालकमंत्री पद देऊन महाविकास आघाडी सरकारमध्ये स्थान दिलेले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत देशातील मोदी लाटेचा लाभ उठवत भाजपने सातारच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळविले.

सातारा : राष्ट्रवादी २०२१ : राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्ष आज आपला 22 वा वर्धापन दिन साजरा करत असताना पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात पक्षाची मोठी पडझड झालेली आहे. बालेकिल्ल्यात भाजप व शिवसेनेने शिरकाव केला आहे. आज जिल्ह्यात राष्ट्रवादीचे विधानसभेचे तीन, विधान परिषदेचे दोन आमदार  आहेत. तर भाजपचे दोन, शिवसेनेचे दोन व काँग्रेसचा एकमेव आमदार राहिला आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जिल्ह्याने प्रेम केले त्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे बुरूज ढासळल्याचे चित्र आहे.

सातारा-जावळी, कोरेगाव, पाटण मतदारसंघ राष्ट्रवादीने २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत गमावले आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, पालिकांच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला तटबंदी पक्की करावी लागणार आहे.  दहा जून १९९९ ला काँग्रेसमध्ये बाहेर पडून खासदार शरद पवार यांनी आपल्या चार सहकाऱ्यांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत सर्वप्रथम सातारा जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सातारा राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. एक एक करत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविले.

हेही वाचा : महाविकास आघाडी सरकार किती दिवस टिकणार यावर पवारांचे मोठे वक्तव्य

सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक, जिल्हा परिषदही ताब्यात घेतली. पण २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला भाजप-शिवसेनेशी दोन हात करताना तीन मतदारसंघ गमवावे लागले. तर पाटणमध्ये दुसऱ्यांदा शिवसेनेचा आमदार निवडून आला. कोरेगावमध्ये राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद शशीकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला. शिवसेनेचे नवखे उमेदवार महेश शिंदे यांनी त्यांचा सहजरित्या पराभव केला.

आवश्य वाचा : कपिल सिब्बल म्हणाले, आयाराम, गयाराम गेले अन् आता आले प्रसादराम!

तर सातारा-जावळीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. ते सातारा-जावळीतून भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. येथे राष्ट्रवादीला शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात सक्षम उमेदवार देता आला नाही. माण-खटाव मतदारसंघ घेण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत राष्ट्रवादीला यश आलेले नाही. येथे काँग्रेसमधूनही व आता भाजपमधूनही जयकुमार गोरे हेच आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. यामध्ये फलटणचे दीपक चव्हाण, वाईचे मकरंद पाटील आणि कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील या तिघांचा समावेश आहे. यापैकी बाळासाहेब पाटील यांना सहकार व पालकमंत्री पद देऊन महाविकास आघाडी सरकारमध्ये स्थान दिलेले आहे. तर शिवसेनेच्यावतीने शंभूराज देसाई यांना गृहराज्यमंत्री पद देण्यात आलेले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत देशातील मोदी लाटेचा लाभ उठवत भाजपने सातारच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळविले.

परिणामी भाजपचे दोन आमदार व दोन खासदार सातारा जिल्ह्यात आहेत. यापैकी उदयनराजेंना त्यांनी राज्यसभेवर घेतले आहे. राष्ट्रवादीचे खासदार म्हणून श्रीनिवास पाटील सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच पालिकांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीला आपले ढासळलेले बुरूजांची बांधणी करताना तटबंदी पक्की करावी लागणार आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख