सोमय्या गिधाडासारखे कागद घेऊन फडफडताहेत : संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Hits at Kirit Somayya | Politics Marathi News - Sarkarnama

सोमय्या गिधाडासारखे कागद घेऊन फडफडताहेत : संजय राऊतांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

अर्णब गोसावी यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर अन्वय नाईक परिवार आणि ठाकरे परिवार यांच्यातील आर्थिक संबंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपा नेते डॉ.किरीट सोमैय्या यांनी केली आहे. या आरोपांवरुन शिवसेनेचे नेते चवताळले आहेत

मुंबई : किरीट सोमय्या गिधाडासारखे हातात पेपर घेऊन फडफडताहेत. त्यांनी कितीही फडफड केली तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. स्वतःच्या तोंडाला शेणाचा वास येतो आहे, हे त्यांनी पहावे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सोमय्या यांनी अन्वय नाईक प्रकरणात शिवसेनेवर केलेल्या आरोपांमुळे आता शिवसेनेचे नेते चवताळले आहेत.

अर्णब गोसावी यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर अन्वय नाईक परिवार आणि ठाकरे परिवार यांच्यातील आर्थिक संबंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपा नेते डॉ.किरीट सोमैय्या यांनी केली आहे. कोर्लई, तालुका मुरुड, जिल्हा रायगड येथील अन्वय नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांनी २१ प्लॉट श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे व श्रीमती मनिषा रविंद्र रायकर यांना विकले असल्याचे कागदपत्रांवरून दिसते, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.  यातील काही जमीन वन, खाजगी वने असल्याचे वाटते. या जमिनीस वनेतर वापरास बंदी आहे. वनेतर वापरासाठी केंद्र शासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

या जमीन व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे  व श्रीमती मनिषा रविंद्र वायकर यांची नावे आहेत. श्री. रविंद्र वायकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते  मंत्रीही होते. श्रीमती मनिषा ह्या श्री. रविंद्र वायकरांच्या पत्नी आहेत. श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे व श्रीमती मनिषा रविंद्र वायकर यांचे संबंध आर्थिक आहेत, व्यवसायिक आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो, असेही सोमय्या यांनी म्हटले होते. त्याला राऊत यांनी उत्तर दिले आहे. सोमय्या रोज सकाळी स्वतःची प्रतिमा पाहतात आणि मग त्यांना भ्रष्टाचार दिसतो, असाही वार राऊत यांनी केला आहे. ही बनावट व्यापारी ढोंगी लोक आहेत. आम्ही दलालांना घरी बसवले आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख