राष्ट्रवादीला १५ जागा मिळतील असा अंदाज होता, पण....? - NCP was expected to get 15 seats, but ....? | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीला १५ जागा मिळतील असा अंदाज होता, पण....?

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

पवार साहेबांना ईडीची नोटीस आली. आपले भाग्य असे की त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र पवारसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. तेथूनच गेम चेंज झाला. त्याबद्दल मी जनतेचे आभार मानते. त्यानंतर साताऱ्याची पावसाची सभा झाली. विधानसभा निवडणूकीत १५ ऐवजी ५४  जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या.

ठाणे : विधानसभा निवडणूकीवेळी सर्व्हे आला होता. यामध्ये राष्ट्रवादीला केवळ १२ ते १५ जागा मिळतील, असे सांगण्यात आले होते. आमच्या पक्षाचे काय होणार असा प्रश्न पडला होता. एका स्नेहीने तर आम्हाला २०२४ ची तयारी करा असे सांगितले होते. मात्र, त्याच दरम्यान पवार साहेबांना ईडीची नोटीस आली आणि महाराष्ट्रातील जनता पवारसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, याचा मला खूप अभिमान वाटतो. त्यामुळे मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानते, असे सांगून सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यातील पावसाच्या सभेचे उदाहरण देत पडझड झालेली राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ जागा खेचू आणल्याचे सांगितले. 
 
अंबरनाथ येथील कार्यकर्ता मेळाव्यात खासदार सुळे बोलत होत्या. विधानसभा निवडणूकीतील आठवणींना उजाळा देताना खासदार सुळे म्हणाल्या, विधानसभा निवडणूकीतील सर्व्हेत राष्ट्रवादीचे १२ ते १४ आमदार निवडून येतील असे सांगण्यात आले होते. काँग्रेसला व आपल्याला २५ आमदारात गुंडाळले होते. विरोधक म्हणत होते आम्हाला कुस्ती खेळायची आहे, पण समोर कोणी पैलवानच दिसतच नाही. आता पक्षाचे पुढे काय होणार असे आम्हाला वाटत होते.

त्यावर मी माझे एक स्नेही मित्र असून त्यांना पक्षांचा दांडगा अनुभव आहे. मी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना आम्ही भेटण्यास बोलावले. अजित दादा, जयंतराव व पवार साहेब आम्ही त्यांच्यासमोर थांबलो. त्यांनी तर आम्हाला तुमच्या पक्षाचे काहीही होणार नाही तुम्ही निवडणूक लढण्याच्या भानगडीत पडू नका. २०२४ ची तयारी करा, असे सांगितले. या विषयावर आम्ही दोन तास गप्पा मारल्या.

पवार साहेबांनी तर यावर एक शब्दही काढला नाही. यानंतर मला डेंगी झाला तर पवार साहेबांना ईडीची नोटीस आली. आपले भाग्य असे की त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र पवारसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. तेथूनच गेम चेंज झाला. त्याबद्दल मी जनतेचे आभार मानते. त्यानंतर साताऱ्याची पावसाची सभा झाली. विधानसभा निवडणूकीत १५ ऐवजी ५४  जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या.

 सातारच्या सभेचा फोटो ...

बिहारच्या तेजस्वी यादव यांची आठवण सांगताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बिहारच्या निवडणूकीत तेजस्वी यादव याचीही राष्ट्रवादीसारखीच परिस्थिती झाली होती. पण त्यांनी साताऱ्याच्या पवारसाहेबांच्या सभेचा फोटो डोळ्यासमोर ठेवत वडीलांचे आशिर्वाद घेतले आणि बिहारची निवडणूक लढली. बिहारच्या जनतेने त्यांच्यावर इतका विश्वास दाखविला, आज ना उदया तो बिहारचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख