आमदार, खासदार निधीचे पैसे गेले कुठे; उदयनराजेंचा केंद्र, राज्य सरकाला सवाल - Rulers who do not deserve the trust of the people do not deserve to remain in office Says MP Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार, खासदार निधीचे पैसे गेले कुठे; उदयनराजेंचा केंद्र, राज्य सरकाला सवाल

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

काही जण डोक्‍याने फक्त पैशाचा विचार करतात आणि मी फक्त भावनेचा विचार करतो. जर हिंमत असेल तर समोर येऊन बोला, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे. जगात एवढे व्हायरस आहेत. त्यापैकी कोरोना एक आहे. परंतु सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोणाला कोरोना होऊ नये, असेही उदयनराजेंनी नमूद केले.

सातारा : कोरोनाच्या उपचारासाठी बेड, व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. खरं तर आमदार, खासदारांच्या निधीचे पैसे गेले कुठे, याचे उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिले पाहिजे, असा प्रश्‍न उपस्थित करुन आई तुळजाभवानीया राज्यकर्त्यांना बुद्धी दे, ज्या लोकांनी राज्यकर्त्यांना निवडून दिले त्यांची काळजी नाही. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला पात्र नसलेल्या राज्यकर्त्यांना पदावर राहण्याची लायकी नाही, अशी परखड टीका साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विजयादशमी दिवशीच केंद्र व राज्य सरकारवर  केली. 

विजयादशमी निमित्त काल (रविवारी) जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन यंदा शाही मिरवणूक रद्द करण्यात आली. प्रारंभी उदयनराजे भोसले कोरोनाचे सावट पसरल्याने विविध रुढी, परंपरा सण यावर्षी साजरे करता येत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यानंतर राजघराण्याच्या वतीने सर्वांना शुभेच्छा दिल्या.

उदयनराजे म्हणाले, कोरोनामुळे सर्व काही हिरावून घेतले आहे. जो काल होता तो आज नाही हे ऐकून वाईट वाटते. प्रत्येकाने खूप खूप काळजी घ्यावी एवढेच मी सांगतो. देशातील सर्व खासदार आणि आमदारांचे दोन वर्षातील संपूर्ण खासदार,आमदार निधी वर्ग करून घेतल्याने लोक आम्हांला जाब विचारत आहेत. मी केवळ राज्यपुरता न बोलता हा निधी नेमके गेला कुठे? कोरोना काळात प्रत्येकाला बेड, व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे.

मग एवढे खासदार, आमदार निधीचे पैसे गेले कुठे याचे उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने देणे गरजेचे आहे, असा प्रश्‍न उदयनराजेंनी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले, आई भवानी राज्यकर्त्यांना बुद्धी दे. ज्या लोकांनी राज्यकर्त्यांना निवडून दिले त्यांची काळजी नाही. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला पात्र नसलेल्याराज्यकर्त्यांना पदावर राहण्याची लायकी नाही.  कोरोनाबाबतचे निर्णय जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिले असल्याने आणि प्रशासन लोकप्रतिनिधींचा अभिप्राय घेत नाही.

त्यामुळे ही संपूर्ण यंत्रणा जनसामान्यांना विचारात घेऊन केली जात नाही. हा सर्व खटाटोप पैशासाठी चालला असल्याचा आरोपही उदयनराजे भोसले यांनी केला आहे. कोरोनाबाबत प्रांत, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या महसूल विभागाचा आरोग्य यंत्रणेशी काय संबंध? याबाबत डॉक्‍टर, फिजीशिअन यांना मिळणाऱ्या वेतनात वाढ करावी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. 

जगात एवढे व्हायरस आहेत. त्यापैकी कोरोना एक आहे. परंतु सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोणाला कोरोना होऊ नये, असेही उदयनराजेंनी नमूद केले. परंतु हे असेच चालत राहिले तर सामान्य जनता पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरु देणार नाहीत. मला प्रश्न विचारायचे नाही. मला वेदना होतात म्हणून हे सर्व बोललो असल्याचे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

हिंमत असेल तर समोर येऊन बोला....

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोक मरायला लागली आहेत. काही जण डोक्‍याने फक्त पैशाचा विचार करतात आणि मी फक्त भावनेचा विचार करतो. जर हिंमत असेल तर समोर येऊन बोला, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख