राहुल यांना कोणीही महत्त्व देत नाही : नरेंद्र तोमर - No one cares about Rahul Gandhi Says Minister Narendra Tomar | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल यांना कोणीही महत्त्व देत नाही : नरेंद्र तोमर

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

मंत्री तोमर यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, जर राहुल गांधींना शेतकऱ्यांची इतकी काळजी असती तर दहा वर्षे सत्तेत असताना त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी थोडे तरी काही केले असते.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी जे काही बोलतात ते त्यांच्या पक्षातही कोणी गंभीरपणे घेत नाही; मग देशाची तर गोष्टच दूरच राहिली, अशा शब्दांत केंद्र सरकारकडून आजच्या आंदोलनाची खिल्ली उडविण्यात आली. आपल्याला जे शेतकरी भेटले त्या साऱ्यांनी, आमच्याकडे कोणीच सह्या मागण्यास आलेले नाही, असे सांगितल्याचे कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी उपरोधिकपणे सांगितले.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राष्ट्रपतींना भेटून त्यांना कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन दिले. त्यांवर मंत्री तोमर यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, जर राहुल गांधींना शेतकऱ्यांची इतकी काळजी असती तर दहा वर्षे सत्तेत असताना त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी थोडे तरी काही केले असते.

कॉँग्रेसचा इतिहास कायम शेतकरी विरोधी राहिला आहे, अशी टीका त्यांनी केली.कॉँग्रेसचे कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांत दोन लाख लोकांनाही भेटले नसतील; मग काँग्रेसच्या पत्रातील सह्या देणाऱ्या शेतकऱ्यांचा दोन कोटींचा आकडा कोठून आला, असा उपरोधिक सवाल भाजप नेते शहानवाज हुसेन यांनी केला आहे.

ते आश्‍वासन काँग्रेसचे...

 काँग्रेस व राहुल गांधी आता शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री कैलास चौधरी यांनी केली आहे. ते म्हणाले की, ''याच काँग्रेसने २०१९ च्या निवडणूक जाहीरनाम्यात बाजार समित्यांचा एपीएमसी कायदा रद्द करू व हेच तिन्ही कायदेही मंजूर करू असे आश्‍वासन दिले होते. आता याच पक्षाने केवळ राजकीय स्वार्थासाठी कोलांडउडी मारली आहे.''

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख