शेतकरी विरोधी विधेयकांतून मोदी सरकाने लोकशाहीचा गळा घोटला : पृथ्वीराज चव्हाण - Modi govt strangles democracy with anti-farmer bills Says Congress Leader Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी विरोधी विधेयकांतून मोदी सरकाने लोकशाहीचा गळा घोटला : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं मोदी म्हणाले होते पण शेतकऱ्यांना सध्या हमीभावही मिळत नाही. हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करायची मागणी आम्ही आज राज्यपालांकडे केली आहे. या कृषी विधेयका विरोधात काँग्रेस पक्ष देशव्यापी आंदोलन करणार आहे.

सातारा : मोदी सरकारने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे हे विधेयक असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

केंद्र सरकारे कृषी व कामगारांसंदर्भातील विधेयके बहुमताच्या जोरावर लोकसभेत मंजूर करून घेतली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरपासून किसान मजदूर बचाओ दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर श्री. चव्हाण यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे  शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. विधेयक संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठवावे, असा आमचा आग्रह होता. किमान भाजपाने आपला मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाशी याबाबत चर्चा करायला हवी होती.

मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करायला हवी होती. पण त्यांनी ते ही केले नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं मोदी म्हणाले होते पण शेतकऱ्यांना सध्या हमीभावही मिळत नाही. हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करायची मागणी आम्ही आज राज्यपालांकडे केली आहे. या कृषी विधेयका विरोधात काँग्रेस पक्ष देशव्यापी आंदोलन करणार आहे.

याचाच एक भाग म्हणून आज प्रातिनिधिक स्वरूपात काँग्रेसचे खासदार, आमदार, पदाधिकारी असे आम्ही सर्वजण राज्यपालांना भेटलो. या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात येत्या दोन ऑक्टोबर हा दिवस किसान मजदूर बचाओ दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहोत. राज्यातील सर्व जिल्हा व विधानसभा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख