मोदींच्या भाषणातील अनेक संदर्भ चुकीचे : तृणमूल काँग्रेसची टीका - Many references in Modi's speech are wrong: Criticism of Trinamool Congress | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींच्या भाषणातील अनेक संदर्भ चुकीचे : तृणमूल काँग्रेसची टीका

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

विश्‍वभारती हे केंद्रीय विद्यापीठ असून पंतप्रधान हे त्याचे पदसिद्ध प्रमुख असतात.  मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलल्या भाषणात टागोर यांच्या विचारांना राष्ट्रवादाचे लेबल लावल्यावरून तृणमूलने संताप व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्‍वभारती विद्यापीठाच्या शताब्दी समारंभात केलेल्या भाषणातील काही उल्लेख अत्यंत चुकीचे उल्लेख असल्याबद्दल तसेच गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारसरणीला राष्ट्रवादाचे लेबल लावल्याबद्दल पश्‍चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आमंत्रित न केल्याचा आरोपही तृणमूलने केला आहे. 

दरम्यान, भाजपने ममता बॅनर्जी यांना या कार्यक्रमाला रीतसर आमंत्रित करूनही त्या गैरहजर राहिल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला आल्या नाहीत, असे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सांगितले.

या आमंत्रण पत्राची एक प्रत सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विश्‍वभारती हे केंद्रीय विद्यापीठ असून पंतप्रधान हे त्याचे पदसिद्ध प्रमुख असतात.  मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलल्या भाषणात टागोर यांच्या विचारांना राष्ट्रवादाचे लेबल लावल्यावरून तृणमूलने संताप व्यक्त केला आहे.

टागोरांचा राष्ट्रवादाला विरोध
गुजरात व टागोर यांचा संबंध अशा रितीने जोडणे अक्षम्य असल्याचा पलटवार तृणमूलने केला आहे. बंगाल सरकारमधील मंत्री ब्रत्य बोस म्हणाले की, गुरुदेवांचे विचार आणि मोदींच्या भाषणात पूर्ण विसंगती आहे. टागोर यांनी राष्ट्रवादाची वकिली तर केली नाहीच पण 'घरे बैरे' कादंबरीत त्यांनी राष्ट्रवाद हे विभाजनकारी व्यसन आहे, असा उल्लेख केला आहे. टागोर यांच्या मते धर्म म्हणजे मानव धर्म आहे असेही त्यांनी सांगितले.

हे उल्लेख चुकले....
टागोर यांच्या बंधूंच्या पत्नीबाबत मोदींनी जो उल्लेख केला त्याबाबत बोस म्हणाले की, मोदींनी सांगितले त्याप्रमाणे सत्येंद्रनाथ बोस यांच्या पत्नीचे नाव ज्ञानेंद्री देवी नव्हते तर त्यांचे नाव ज्ञानदानंदिनी होते. गुजरातमध्ये आल्यावर त्यांनी साडीचा पदर उलटा घेण्याचा सल्ला गुजराती महिलांना दिला हाही मोदींचा उल्लेख अत्यंत चुकीचा आहे. मुळात सत्येंद्रनाथ हे रवींद्रनाथ यांचे सर्वांत मोठे भाऊ नव्हते, हेही बोस यांनी लक्षात आणून दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख