मराठा आरक्षणावर जबाबदारीने निर्णय घ्या, अन्यथा उद्रेक होईल : उदयनराजे - Decide responsibly on Maratha reservation, otherwise there will be an outbreak Says MP Udayanraje | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणावर जबाबदारीने निर्णय घ्या, अन्यथा उद्रेक होईल : उदयनराजे

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात पाहिली नाही. सर्वधर्म समभावातून स्वराज्याची स्थापना केली. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी वाटचाल केली. त्यांना आपण दैवत म्हणून बघतो, त्यांचेच विचार घेऊन आज आपण या प्रश्नावर  वाटचाल केली पाहिजे, अशी अपेक्षा उदयनराजेंनी शेवटी व्यक्त केली. 

 सातारा : मराठा आरक्षण प्रश्नाचे नेतृत्व कोणी करायचे हे महत्वाचे नाही. सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. शासन, राजकिय पक्ष व न्यायालय यांनीही जबाबदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे. तसे झाले नाही तर उद्रेक होईल. त्याला जबाबदार कोण, लोक हातश झाल्यावर काय करणार, असा प्रश्न उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. 

 शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात तीन ऑक्टोबरला होणाऱ्या विचारमंथन बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यावेळी दोन्ही नेत्यांनी आरक्षण प्रश्नावर तासभर चर्चाही केली. माजी सभापती सुनील काटकर, शरद काटकर, हरिष पाटणे उपस्थित होते. 

यावेळी उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर या समाजात संताप निर्माण झाला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला मराठा समाजातील प्रमुख लोकांची बैठक होत आहे. मुळात हा आरक्षणाचा प्रश्न निर्माणच व्हायला नको होता. मराठा समाजाची माफक मागणी होती, प्रत्येकाला ज्या पध्दतीने आरक्षण दिले त्यापध्दतीनेच आम्हालाही मिळावे.

संपूर्ण कष्ट करण्याची तयारी असताना ही या समाजावर अन्याय झाला असून हा समाज उपेक्षित राहिला आहे. प्रत्येक वेळी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला की इतर लोकांकडून विरोधात मोर्चे काढले जातात, कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, आज बऱ्याशाच मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यांच्या मुलांनी व तरूणांनी जायचे कुठे. शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर मराठा समाजातील मुलामुलींना चांगले मार्कस्‌ मिळाले तरी त्याला ॲडमिशन मिळत नाही. उलट कमी मार्कस्‌ असलेल्यांना ॲडमिशन मिळते.

विद्यार्थी कोणताही असू देत प्रत्येकाला बुध्दी दिलेली आहे. मी अनेकदा सांगितलं आहे, आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा व मेरिटवर निवड करा. मराठा समाजातील मुलाने कष्ट घेऊन चांगले मार्क मिळविले. पण त्याला ॲडमिशन न मिळाल्याने नैराश्य येते. काही लोक आत्महत्या करतात, काही नेस्तनाबूत होतात.

त्यामुळे मराठा समाजाच्या मुलाने आपली महत्वाकांक्षा कशी पूर्ण करायची, असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, राज्य शासन, केंद्र शासन असून देत ही सर्व माणसेच आहेत. त्यांनी थोडेसे माणुसकीच्या दृष्टीने विचार करायला हवा. ते मराठा समाजात जन्माला आले असते तर आज जे माझे मत आहे, तेच मत त्यांचेही असते.  

पुण्यातील या बैठकीला मी जाणार असून तेथे ठोस चर्चा होईल. या  बेठकीला माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी असणार आहेत. त्यांचा अनुभव  लक्षात घेता मराठा आरक्षण प्रश्नासाठी नेतृत्व कोणी करायचे हे महत्वाचे नाही, सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. शासन, राजकिय पक्ष व न्यायालय असेल यांनीही जबाबदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे. तसे झाले नाही तर उद्रेक होईल त्याला  जबाबदार कोण, लोक हातश झाल्यावर काय करणार, असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला. 

दुसऱ्याचे कामी करून आम्हाला दया, असे मराठा समाजातील कोणीही म्हणत नाही. त्यांना दिले तसेच मराठा समाजाला देऊन टाका, अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात पाहिली नाही. सर्वधर्म समभावातून स्वराज्याची स्थापना केली. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी वाटचाल केली. त्यांना आपण दैवत म्हणून बघतो, त्यांचेच विचार घेऊन आज आपण या प्रश्नावर  वाटचाल केली पाहिजे, अशी अपेक्षा उदयनराजेंनी शेवटी व्यक्त केली. 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख