पोलिस महासंचालक पदासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री व शरद पवार यांच्यात झाली चर्चा - Sharad Pawar, Anil Deshmukh and CM Had Deliberations for DGP's Post | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस महासंचालक पदासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री व शरद पवार यांच्यात झाली चर्चा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती झाल्याने राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी जोरादर लॉबिंग सुरु झाली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात गुरूवारी (ता. ३१) चर्चा झाली.

मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती झाल्याने राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी जोरादर लॉबिंग सुरु झाली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात गुरूवारी (ता. ३१) चर्चा झाली. या पदासाठी संजय पांडे, हेमंत नगराळे, परमबीर सिंग, रजनिश सेठ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. या शर्यतीत बिपीन बिहारी यांचे देखील नाव होते; मात्र ते जानेवारी महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार असल्याने त्यांचे नाव मागे पडले आहे.

महाविकास आघाडीशी सातत्याने सुरु असलेल्या वादामुळे सुबोध जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत जाण्यासाठी अर्ज केला होता. सुबोध जयस्वाल हे 1985 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तीन वर्षांपूर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यानंतर त्यांना बढती मिळाली आणि ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले. सरकार आणि सुबोध जैस्वाल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या बदल्या मी होऊ देणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला होता. राज्य सरकारबरोबर पटत नसल्याने त्यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सुबोध जैयस्वाल यांची सीआयएसएफ महासंचालकपदाचा कार्यकाळ हा नियुक्तीपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत असणार आहे.

सुबोध जयस्वाल यांच्यानंतर आता संजय पांडे, हेमंत नगराळे, परमबिर सिंह यांची नावे नव्या पोलीस महासंचालकांच्या पदाच्या शर्यतीत आहेत. सध्या संजय पांडे याचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचा पांडे यांच्या नावावर आक्षेप नाही. ती त्यांच्यासाठी जमेची बाजू असू शकते. दुसरीकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील मत महत्वाचे आहे. त्यांचे मत हेमंत नगराळे यांच्या पारड्यात जाण्याची शक्‍यता आहे. या पदासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची देखील वर्णी लागण्याची शक्‍यता आहे; मात्र शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये त्याबाबत एकमत होणे आवश्‍यक आहे. असे असले तरी मुंबई पोलीस आयुक्त पद सोडण्यासाठी सध्या परबीर सिंग उत्सुक नाहीत, असेच सूत्रांनी सांगितले.

लवकरच निर्णयाची शक्‍यता!
सुशांतसिंग प्रकरणामुळे नाराजी ओढावलेल्या मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावावर शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात एकमत होणे, सध्यातरी शक्‍य नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे मातोश्रीला परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्त पदावर नको असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच या सर्वांमध्ये रजनिश सेठ यांचे नावदेखील चर्चेत आहे. त्यामुळे महासंचालकपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार हे लवकरच समजेल, असे वरिष्ठ गोटातून सांगण्यात आले आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख