जिलानी इमारत दुर्घटनेस भिवंडी पालिका प्रशासनच जबाबदार : निलेश चौधरी  - Bhiwandi Palika administration responsible for Jilani building accident Says BJP Leader Nilesh Chaudhary | Politics Marathi News - Sarkarnama

जिलानी इमारत दुर्घटनेस भिवंडी पालिका प्रशासनच जबाबदार : निलेश चौधरी 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

पालिका प्रशासनाचे अधिकारी धोकादायक इमारतीत राहात असलेल्या रहिवाशांना नोटीस बजावतात. मात्र, कारवाई व त्यांच्या पुनर्वसनाबाबत भूमिका घेत नाहीत. त्यामुळे रहिवासी इमारती खाली करण्यास तयार होत नाही. याबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे परखड मतही श्री. चौधरी यांनी मांडले.

भिवंडी : भिवंडी महापालिकेतील स्थायी समितीच्या सोळा सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त झाल्याने नव्या आठ सदस्यांच्या निवडी करीता विशेष महासभा ऑनलाईन पद्धतीने झाली. यावेळी भिवंडी शहरातील जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेस महापालिका प्रशासन जबाबदार आहे, अशी टीका नगरसेवक निलेश चौधरी यांनी व्यक्त करून पालिका प्रशासनाचा अधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान, पालिका प्रशासनाचे अधिकारी धोकादायक इमारतीत राहात असलेल्या रहिवाशांना नोटीस बजावतात. मात्र, कारवाई व त्यांच्या पुनर्वसनाबाबत भूमिका घेत नाहीत. त्यामुळे रहिवासी इमारती खाली करण्यास तयार होत नाही. याबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे परखड मतही श्री. चौधरी यांनी मांडले.

भिवंडी पालिकेच्या मुख्य सभागृहात पिठासिन अधिकारी तथा महापौर प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महासभेत कोणार्क विकास आघाडीतर्फे विलास पाटील, काँग्रेसकडून अरुण राऊत, मोहम्मद हलीम अन्सारी, आरिफ मोहम्मद हनीफ खान, प्रशांत लाड, डॉ. जुबेर अन्सारी, शिवसेनेकडून संजय म्हात्रे आणि वंदना मनोज काटेकर अशा नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली.

पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस पाच, शिवसेना दोन आणि कोणार्क विकास आघाडीच्या एका सदस्यांची वर्णी लागली आहे. स्थायी समितीवरील आठ सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने काँग्रेसचे सिराज ताहीर मोमीन, मोहम्मद हलीम अन्सारी, अंजुम अहमद हुसैन सिद्दिकी, परवेज अहमद सिराज अहमद मोमीन, मोहम्मद वसीम अन्सारी, शिवसेनेचे बाळाराम चौधरी आणि मदन कृष्णा नाईक व कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील हे आठ सदस्य निवृत्त झाल्यामुळे या आठ सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली.

एकूण सोळा सदस्य असलेल्या स्थायी समितीची रचना लक्षात घेता शिवसेना दोन सदस्य, भाजपा चार, कोणार्क  विकास आघाडी दोन आणि काँग्रेस पक्ष आठ असे पक्षीय बलाबल आहे. ऑनलाईन महासभेत गटनेत्यांनी स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीबाबत पिठासन अधिकारी यांच्याकडे सीलबंद लिफाफ्यात नाव दिली. त्या शिफारशीनुसार नवीन स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आल्याचे महापौर पाटील यांनी महासभेत जाहीर केले.

सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे महापौर प्रतिभा पाटील, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपमहापौर इम्रान खान यांनी अभिनंदन करून महासभेचे कामकाज तहकूब केले. या ऑनलाईन महासभेच्या सुरवातीला नुकताच भिवंडीत झालेल्या इमारत दुर्घटनेबाबत नगरसेविका रिषिका राका यांनी  श्रद्धांजली व्यक्त केली. या दुर्घटनेस प्रशासनाची कारवाई करण्यात केली जाणारी हयगय कारणीभूत असल्याचा आरोप केला नगरसेवक निलेश चौधरी यांनी या दुर्घटनेस पालिका प्रशासनास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख