सचिन वाझेंशी संबंधित तब्बल १२० टीबींचे फुटेज ताब्यात - 120 TB footage related to Sachin Waze in possession | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझेंशी संबंधित तब्बल १२० टीबींचे फुटेज ताब्यात

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

एका अनोखळी व्यक्तीचा पासपोर्टही वाझेंच्या घरी सापडला आहे. कोणी आपला पोसपोर्ट दुस-याकडे देतो का, त्यामुळे त्यादृष्टीने तपास होणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद एनआयएने विशेष कोर्टात केला.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्या बाहेर सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी सचिन वाझे यांन आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टापुढे हजर करण्यात आले. सचिन वाझेंवर लावलेल्या आरोपांशी संबंधित तब्बल 120 टीबींचे सीसीटिव्ही फुटेज एनआयएच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केले आहे. एका अनोखळी व्यक्तीचा पासपोर्टही वाझेंच्या घरी सापडला आहे. 

त्यामुळे त्यादृष्टीने तपास करणे आवश्यक असल्याने एनआयएने पुढील तपासासाठी वाझेंना आणखी सहा दिवसांची कोठडी वाढवून मागितली. त्यानुसार न्यायालयाने सात एप्रिलपर्यंत वाझेंची कोठडी वाढविली आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बंगल्याबाहेर सापडलेली स्फोटके तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या ताब्यात आहे.

आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टापुढे हजर करण्यात आले. पुढील तपासासाठी वाझेंची आणखीन सहा दिवस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली. या प्रकरणाशी संबंधित सीपीयू, डिव्हीआर, प्रिंटर, लॅपटॉप, हार्डडिस्क आदी साहित्य मिठी नदीतून एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहे. 

तसेच एका अनोखळी व्यक्तीचा पासपोर्टही वाझेंच्या घरी सापडला आहे. कोणी आपला पोसपोर्ट दुस-याकडे देतो का, त्यामुळे त्यादृष्टीने तपास होणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद एनआयएने विशेष कोर्टात केला. दरम्यान, मिठी नदीत सापडलेल्या वस्तूंच्या आधारावर कस्टडी मागितली जात आहे. हा केवळ बनाव असून एनआयएचा  डीसीबी बँकेतील जॉईंट अकाऊंटचा बाबतचा आरोपही वाझेंच्यावतीने न्यायालयात नाकारण्यात आला.

तसेच तपास यंत्रणेचे आरोप वाझेंच्यावतीने फेटाळण्यात आले. सचिन वाझेंवर लावलेल्या आरोपांशी संबंधित 120 टिबीचं सीसीटिव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत तो कुठे गेला, कुणाला भेटला, का भेटला. स्फोटकांचं सामन कसं गोळा केलं, मिठी नदीतून सापडेलेल्या गोष्टींतून डेटा रिकव्हर करायचा आहे, असा युक्तीवाद एनआयएच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. 

मी सध्या ह्रदयविकाराने ञस्त असून रविवारी आपल्याला स्ट्रोक आल्याचे स्वतः वाझेंनी न्यायालयात सांगितले. तर वाझेंना अँजिओग्राफीची गरज असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. तर एनआयएने वाझेंना योग्य ते उपचार मिळत असून ताब्यात घेतल्यापासून त्यांची दोनदा टुडी इको, ब्लड टेस्ट करण्यात आल्याची माहिती देत वाझेंची प्रकृती ठणठणीत असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सचिन वाझेंना सात एप्रिलपर्यंत कोठडी वाढवून दिली आहे.  दरम्यान, माझा न्याय व्यवस्थेवर आणि एनआयएवर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया वाझेंचे बंधू सुधर्म वाझे यांनी दिली आहे. 
 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख