mumbai politics | Sarkarnama

शिक्षण सचिव शिक्षक आमदारांच्या हिटलिस्टवर

संजीव भागवत
बुधवार, 26 एप्रिल 2017

राज्यातील शालेय शिक्षण विभागातील अनागोंदीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार हेच जबाबदार असल्याने त्यांचे तातडीने निलंबन करावे, यामागणीसाठी भाजपासह इतर पक्षाच्या आमदारांनी मोर्चेबांधणी केली आहे.

मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण विभागातील अनागोंदीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार हेच जबाबदार असल्याने त्यांचे तातडीने निलंबन करावे, यामागणीसाठी भाजपासह इतर पक्षाच्या आमदारांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागील दोन महिन्यांपासून अनेकदा निवेदनही या आमदारांनी दिले आहे.

मुख्यमंत्री लवकरच या आमदारांचे गा-हाणे ऐकूण घेणार असल्याने शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचीही मोठी अडचण यानिमित्ताने होणार असल्याचे बोलले जात आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा ताशेरे ओढले असतानाच राज्यातील रात्रशाळा बंद करण्यासाठी शिक्षण सचिवांनी आपला अट्टहास कायम ठेवला आहे. वेळोवेळी राज्यात आत्तापर्यंत शालेय शिक्षणासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा या बोगस असल्याचे बेताल वक्तव्य शिक्षण सचिव नंदकुमार करत आहेत. त्यांना आत्तापर्यंत शिक्षणमंत्र्यांनी आवर घातला नसल्याने शिक्षक आमदारांसोबत शिक्षण विभागातील बहुसंख्य मोठ्या अधिका-यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षण विभागातील अधिका-यांची, शिक्षक आमदारांची खदखद ही शिक्षणमंत्र्यांना माहीत असताना ते नंदकुमार यांची पाठराखण का करत आहेत, असा सवाल भाजपाचे नागपूर विभागातील शिक्षक आमदार नागो गाणार यांनी उपस्थित केला आहे. 

अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मागील वर्षांत निलंबित करण्यात आलेल्या आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिका-यांविरूध्द नंदकुमार यांनी जाणीवपूर्वक चौकशी प्रलंबित ठेवली असून यात त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोपही आमदार नागो गाणार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केली. त्यासाठीची चौकशी करण्यात यावी, या आग्रही मागणीचे एक निवेदनही मुख्यमंत्र्यांकडे दिले आल्याची माहिती गाणार यांनी दिली.

नंदकुमार यांनी राज्यातील शालेय शिक्षणाचे पुरते वाटोळे केले असल्याने अशा माणसाला तातडीने या पदावरून हाकलून द्यावे अशी मागणी आपण यापूर्वीही अनेकदा केलेली असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही आमदार नागो गाणार यांनी केला आहे. वेतन अनुदानास पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी शालेय शिक्षण, वित्त विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करणारे व वेतनासाठीच्या जीआरसाठी सचिवांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करून त्यांना जागे करणारे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनीही नंदकुमार यांच्या कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. संचमान्यता, पदांच्या आकृतीबंदासोबतच वेतनेतर अनुदान, शिक्षकांचे समायोजन आदी अनेक बाबी संदर्भात शिक्षण सचिवांचे धोरण हे राज्याच्या शैक्षणिक हितासाठी मारक ठरत असल्याचा आरोपही माजी आमदार रामनाथ मोते यांनी केला आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या नावाखाली नंदकुमार आपल्या गैरकारभाराचे प्रकरणे झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठीच त्यांनी मागील दोन वर्षांमध्ये वारंवार चुकीच्या पद्धतीने शासन निर्णय काढून संपूर्ण शालेय शिक्षण विभागाची आणि राज्याचीच दिशाभुल केली असल्याचा आरोपही गाणार यांनी केला आहे.

औरंगाबाद शिक्षक मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनीही नंदकुमार यांच्या कामकाजावर तीव्र आक्षेप घेतला असून शासनाच्या धोरणाशी विसंगत असे निर्णय घेऊन नंदकुमार यांनी राज्यातील असंख्य शाळा-महाविद्यालयांना अनुदानापासून आणि पदमान्यतेपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे त्यांची या पदावरून उचलबांगडी करावी यासाठी सर्व शिक्षक आमदार मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार असल्याचेही आमदार काळे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख