मुंबई पोलिस दररोज करतात 'सायवॉर'चा सामना

रस्त्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज पोलिसांना समाजमाध्यमांवरही सतर्क राहून प्रक्षोभक पोस्टबाबतही सतर्क रहावे लागत आहे. ग्लोबल प्लॅटफॉर्म असलेल्या इंटरनेटवर कोठूनही संदेश पाठवता येतो. त्यामुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातबसून मुंबईतील कायदा व सुव्यवस्थाही बिघडवली जाऊ शकते
Mumbai Police Daily Facing PSHYWar
Mumbai Police Daily Facing PSHYWar

मुंबई : समाजमाध्यमांवरून प्रक्षोभक संदेशाद्वारे गरळ ओकली जाते,मनात भय निर्माण होईल असा मजकूर प्रसारित केला जातो, धर्म-जातीमध्ये दरी निर्माण होईल, अशा पोस्ट केल्या जातात. अशा पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी आपले मुंबई पोलिस दररोज इंटरनेटरवरील मनोवैज्ञानिक लढाई म्हणजेच 'सायवॉर'शी दोन हात
करत आहेत.

त्या अंतर्गत दररोज किमान 35 प्रक्षोभक पोस्ट हटवल्या जात आहे. 2019 मध्ये मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबने 12 हजार 537 प्रक्षोभक पोस्ट्‌स हटवल्या. त्यातील 1315 पोस्ट्‌स चिथावणीखोर व दहशवादी संघटनांची विचारसरणी पसरवून माथी भडकवणाऱ्या होत्या. याशिवाय धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट अपलोड
करणाऱ्या तिघांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.

रस्त्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज पोलिसांना समाजमाध्यमांवरही सतर्क राहून प्रक्षोभक पोस्टबाबतही सतर्क रहावे लागत आहे. ग्लोबल प्लॅटफॉर्म असलेल्या इंटरनेटवर कोठूनही संदेश पाठवता येतो. त्यामुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यात बसून मुंबईतील कायदा व सुव्यवस्थाही बिघडवली जाऊ शकते. 2018 मध्ये विशेष शाखेच्या सोशल मीडिया लॅबने 6207 प्रक्षोभक पोलिस हटवल्या होत्या. त्यात 2019 मध्ये दुपटीने वाढ झाली असून गेल्या वर्षी समाजमाध्यमांवरील 12 हजार 537 प्रक्षोभक पोलिस पोलिसांनी हटवल्या आहेत. 

2019 या वर्षात मुंबईत लोकसभा निवडणूका, विधानसभा  निवडणुका, शिवसेना व भाजप यांच्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेल्या संघर्ष, काश्‍मिरातून 370 कलम रद्द, अयोध्येतील  राम मंदिराबाबतचा निकाल, जामिया मिलीयासह जेएसयू येथील हिंसा, सीएए-एनआरसी व एनपीआर यांच्याविरोधातील  आंदोलने आदी महत्त्वपूर्ण घटना घडल्या. समाज माध्यमांवरही त्यावरून भरपूर वादळ उठले होते. समोरच्या विचार सरणीविरोधात 'पर्सेप्शन' तयार करण्यासाठी प्रक्षोभक संदेशांची संख्याही त्यामुळे गेल्या वर्षभरात दुपटीने वाढल्याचे  जाणकारांचे मत आहे.

याशिवाय 2018 व 2019चा दोन वर्षांमध्ये हटवण्यात आलेल्या प्रक्षोभक पोस्टमध्ये 2830 पोस्ट या दहतवादी विचारसरणी पसरवणाऱ्या, माथी भडकवणाऱ्या, धार्मिक-जातीय तेढ निर्माण करणाऱ्या होत्या. 2019 मध्ये 1315 अशा पोस्ट हटवण्यात आल्या. त्यात इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया(आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेशी संबंधीत विचारसरणी असलेल्या पोस्टची संख्या अधिक होती.

30 पोलिसांचे पथक 24 तास सक्रिय

फेसबुक,ट्‌वीटर, इन्स्टाग्राम सारख्या समाज माध्यमांवर खोटे संदेश पसवण्याचे प्रमाण अधिक आहेत. सामान्य नागरीक त्यालाच खरे मानून ते संदेश पुढे पाठवतात. काही संदेश तर खूपच प्रक्षोभक असतात गेल्या वर्षीय जाणून बुजून असे प्रक्षोभक संदेश पसरवणाऱ्या तीन व्यक्ती मुंबई पोलिसांच्या रडारवर आल्या होत्या. त्यांच्याविरोधात गुन्हेही नोंदवण्यात आले.

अशा प्रकरणांबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच सर्व पोलिसांना देण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कायदा व सुव्यवस्थेचा तसेच सुरक्षेचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी इंटरनेटवरील संशयीत पोस्टवर विशेष लक्ष ठेवले जाते. त्यासाठी 30 पोलिसांचे पथक विविध शिफ्टमध्ये 24 तास तैनात करण्यात आले आहेत.

►दररोज सुमारे 35 प्रक्षोभक पोस्ट 'डीलीट'
►वर्षभरात 12 हजार 537 प्रक्षोक्षक पोस्ट हटवल्या
►दोन वर्षांत दहशवादी विचारसरणीशी संबंधीत 2830 पोस्ट हटवल्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com