Mumbai News Will Rameshsingh Thakur Create Record in Malad Constituency | Sarkarnama

मालाड मतदारसंघात रमेशसिंह ठाकुर विक्रम नोंदवणार ?

कृष्ण जोशी
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

हा मतदारसंघ काँग्रेसला मजबूत गड असून गेल्या चाळीस वर्षात येथे भाजपला एकदाच विजय मिळवता आला आहे. 1995 च्या भाजपा-शिवसेना लाटेत येथून भाजपचे माधव मराठे विजयी झाले होते. मात्र त्यापूर्वी किंवा त्यानंतर येथे भाजप-शिवसेनेला विजय मिळवता आला नाही. भाजपच्या अनेक मातब्बर उमेदवारांनी येथे प्रयत्न करूनही त्यांना हा काँग्रेसचा गड भेदता आला नाही. आता ती कामगिरी करण्याची नामी संधी रमेशसिंह ठाकूर यांना चालून आली आहे.

मालवणी ही अवाढव्य मुस्लिमबहुल झोपडपट्टी असलेल्या मालाड मतदारसंघात आमदार अस्लम शेख यांच्याविरुद्ध त्यांचेच एकेकाळचे सहकारी भाजपचे बलाढ्य नेते रमेशसिंह ठाकूर उभे ठाकले असून ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात रमेशसिंह ठाकुर हे दोन वेळा आमदार राहिलेल्या असलम शेख यांचा पराभव करून पंचवीस वर्षांनी तेथे भाजपला विजयी करण्याचा विक्रम नोंदवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

हा मतदारसंघ काँग्रेसला मजबूत गड असून गेल्या चाळीस वर्षात येथे भाजपला एकदाच विजय मिळवता आला आहे. 1995 च्या भाजपा-शिवसेना लाटेत येथून भाजपचे माधव मराठे विजयी झाले होते. मात्र त्यापूर्वी किंवा त्यानंतर येथे भाजप-शिवसेनेला विजय मिळवता आला नाही. भाजपच्या अनेक मातब्बर उमेदवारांनी येथे प्रयत्न करूनही त्यांना हा काँग्रेसचा गड भेदता आला नाही. आता ती कामगिरी करण्याची नामी संधी रमेशसिंह ठाकूर यांना चालून आली आहे.

 रमेश सिंह ठाकुर हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसजन आहेत. मात्र, त्यांचे बरेचसे अन्य नातलग भाजपचे आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी  कांदिवलीहुन भाजपचे अतुल भातखळकर यांच्याशी अयशस्वी लढत दिली होती. त्यानंतर आता ते भाजपमध्ये आले असून त्यांना मालाड मतदारसंघात उतरवण्यात आले आहे. मालाड ची लढाई सोपी नाही,  त्यामुळेच व्यावसायिक बिल्डर असलेल्या ठाकूर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसे पाहिले तर असलम शेख व रमेशसिंह ठाकूर हे पूर्वी एकाच पक्षात असल्याने एकमेकांचे सहकारी होते. मात्र, आता ते एकमेकांविरुद्ध झुंजत आहेत

या मतदारसंघात अस्का बीच रिसॉर्ट, मढ रिट्रिट ही पंचतारांकित हॉटेल एकीकडे आहेत, हमला हे नौदलाचे केंद्र आहे, येथे मार्वे-मढ चा निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. तर दुसरीकडे मालवणी ही मुस्लिमबहुल अक्राळविक्राळ झोपडपट्टी आहे. तिच्या वेगळ्याच समस्या आहेत. मढ किनाऱ्यावरील कोळी बांधवांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. या समस्या न सुटण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप करून रमेशसिंह ठाकूर यांनी आक्रमक प्रचार सुरू केला आहे. 

मालवणी च्या मुस्लिमबहुल झोपडपट्टीतून असलम शेख यांना मोठ्या प्रमाणावर मतदान होते. त्यामुळे त्या विभागात शिरकाव करून तेथील मतदारांना आपलेसे करण्याचाही ठाकूर यांनी प्रयत्न चालवला आहे. तेथे त्यांचे चांगले स्वागत होत असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या विभागातील समस्या वर्षांनुवर्षे तशाच राहिल्या असून त्यामुळे लोकांना येणाऱ्या अडचणींना काँग्रेस जबाबदार आहे. त्यामुळे आता हे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपला संधी द्या, असा प्रचार ठाकूर करीत आहेत.

कागदावरील आकडेवारी बघितली येथे भाजपला वातावरण अनुकूल आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना (17 हजार 888) व भाजप (54 हजार 271) यांच्यात मतविभागणी झाल्याने शेख यांना (56 हजार 574) विजय मिळवता आला होता. अन्यथा मागील वेळीच येथे भाजपचे उमेदवार विजय झाला असता. आता शिवसेना-भाजप युती झाली आहे, त्यामुळे शिवसेनेची मते ठाकूर यांनाच मिळतील. तसेच गेल्या निवडणुकीत 14 हजार 425 मते मिळवणारे दीपक पवार हे मनसेचे बलाढ्य नेते देखील आता शिवसेनेत आल्यामुळे त्याचा फायदा रमेशसिंह ठाकूर यांना होईल. 

त्यातच लोकसभा निवडणुकीतही येथून भाजपला 20 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. गुजराती मतदार तर परंपरेने भाजपच्या बाजूने आहे. पण रमेशसिंह ठाकूर हे उत्तर भारतीय असल्यामुळे ती मते देखील त्यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. या सर्वांमुळे भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल सध्या उंचावले आहे. पण ऐनवेळी असलम शेख यांनी काही युक्त्या लढवून पारडे आपल्या बाजूला फिरवू नये म्हणून रमेशसिंह ठाकूर कोणताही धोका न पत्करता जोमाने प्रचार करीत आहेत. या परिसरातील संगीता सुतार तसेच शिवसेनेचे अन्य नगरसेवकही त्यांच्या बरोबरीने प्रचार करत असल्यामुळे यावेळी कधी नव्हे ते मालाडचा काँग्रेसचा किल्ला भेदण्याची संधी भाजपसमोर चालून आली आहे.

निवडणुकी पूर्वी येथे वेगळेच वातावरण होते. काँग्रेसचे आमदार असलम शेख हे बदलते वारे पाहून काँग्रेसचा त्याग करणार, ते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा होती. तसे काही फलकही मतदारसंघात लागले होते. मात्र या दोन्ही पक्षांनी त्यांना प्रवेश दिला नाही अशी देखील चर्चा होती. या गोंधळाच्या वातावरणामुळे काँग्रेसने देखील शेख यांना तिकीटासाठी शेवटपर्यंत तिष्ठत ठेवले होते. अखेर त्यांना तिकीट मिळाले खरे, पण पुढची निवडणुकीतील लढाई ते जिंकतात का हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख